Satara: कोयनेला ३१ मिलीमीटर पाऊस; धरणात १५ टीएमसी साठा
By नितीन काळेल | Published: June 14, 2024 07:16 PM2024-06-14T19:16:35+5:302024-06-14T19:27:22+5:30
धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही
सातारा : जिल्ह्यात आठ दिवसांपासून पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे सर्वाधिक ४५ मिलीमीटरची नोंद झाली, तर कोयनेला ३१ आणि महाबळेश्वरला ३० मिलीमीटर पाऊस पडला. गतवर्षीपेक्षा यंदा या ठिकाणी पाऊस अधिक झाला आहे, तर कोयना धरणात १५ टीएमसी साठा शिल्लक आहे. धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही.
जिल्ह्यात मान्सूनचे वेळेत आगमन झाले. त्यामुळे मागील बुधवारपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. पूर्व, तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मागील सहा महिने दुष्काळी झळा सोसणाऱ्या माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा तालुक्यातही पावसाने चिंब करून सोडले आहे. यामुळे गावोगावच्या ओढ्यांना पाणी वाहिले, तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. परिणामी, खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे, तर आतापर्यंत दुष्काळी तालुक्यात गतवर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले आहे.
सध्या जमिनीला वापसा येण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार आहे, तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात पावसामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत. भात खाचरातही पाणी साचले आहे. त्यामुळे भात लागणीला वेग येऊ लागला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे झाला आहे. १ जूनपासून नवजाला २७३ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे, तर कोयनानगर येथे आतापर्यंत २१२ आणि महाबळेश्वरला २१३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १५.०५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. पाऊस होत असला, तरी धरणात अजून आवक सुरू झालेली नाही, तसेच शुक्रवारीही पश्चिम भागात पाऊस झाला, तर सातारा शहरात सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.
मागील वर्षी महाबळेश्वरला फक्त ७५ मिलीमीटर पाऊस..
जिल्ह्यात या वर्षी पावसाला लवकर सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर, सतत पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वत्रच अधिक पाऊस पडल्याचे दिसून आलेले आहे. गेल्या वर्षी १४ जूनपर्यंत काेयनानगर येथे ४१ मिलीमीटर पाऊस झाला होता, तर नवजाला ४५ आणि महाबळेश्वर येथे ७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी कोयना धरणात १२.०८ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक होता.