विक्रेते जास्त अन् ग्राहक कमी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:18+5:302021-04-16T04:40:18+5:30
कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्रीपासून राज्यात कडक लाॅकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचे परिणाम ...
कराड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्रीपासून राज्यात कडक लाॅकडाऊन किंवा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचे परिणाम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळेे पाहायला मिळत आहेत. कराडच्या छत्रपती शिवाजी भाजीमंडईत मात्र गुरुवारी विक्रेते जास्त आणि ग्राहक कमी अशीच स्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे व्यवसायाची परवानगी असूनही व्यवसायाचं काही खरं नाही; अशा प्रतिक्रिया व्यापारी वर्गातून ऐकायला मिळाल्या.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात मोठे थैमान घातले आहे. याला सातारा जिल्हाही अपवाद नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी सुरुवातीला काही निर्बंध घातले. तरीही जिल्ह्यातील बाधितांचा आकडा कमी व्हायला तयार नाही. मग विकेंड लाॅकडाऊनचा प्रयोग झाला. पण परिस्थिती सुधारत नाही ही बाब प्रशासनाच्या लक्षात आली. आता तर बुधवारी रात्रीपासून सलग पंधरा दिवस राज्यात संचारबंदी लागू केली आहे. पण यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
त्यामुळेच कराडला छत्रपती शिवाजी भाजी मंडई गुरुवारी सुरू होती. सकाळपासूनच विक्रेते माल घेऊन विक्रीला बसले होते. दुपारी भर उन्हाचा तडाखाही त्यांनी सहन केला. पण ग्राहकांची वर्दळ मात्र दिसेना. मंडईत ''विक्रेते जास्त अन् ग्राहक कमी'' अशीच परिस्थिती दिवसभर पाहायला मिळाली. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने विक्रेत्यांनी आवराआवरी करणेच पसंद केले. त्यामुळे आजचा दिवस मंडईतील व्यापाऱ्यांसाठी चांगला गेला नाही.
चौकट
या भाजीमंडईत ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी सुद्धा माल विक्रीसाठी बसत असतो. आज मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी सकाळीच आपला माल होलसेलमध्ये व्यापाऱ्यांना विकून टाकला आणि ते रिकामे झाले. मात्र व्यापाऱ्यांच्या मालाची विक्री न झालेने ते चिंतातुर बनलेले दिसले.
कोट
मंडईमध्ये सकाळपासूनच माल घेऊन विक्रीसाठी बसलो आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नेहमीपेक्षा १० टक्के सुद्धा ग्राहक आज खरेदीसाठी आलेला दिसत नाही. त्यामुळे आजचा दिवस कोणत्याच विक्रेत्याला फायद्याचा ठरणार नाही.
आण्णा शेटे
विक्रेता कराड
फोटो : कराड येथील छत्रपती शिवाजी भाजीमंडईत गुरुवारी असा शुकशुकाट होता.