ज्वारीपेक्षा मका, गहूची पेरणी अधिक : रब्बी पेरणी ७७ टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 11:57 PM2020-01-03T23:57:13+5:302020-01-04T00:16:35+5:30
पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर पेरणीस सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी करण्यात येते. गेल्यावर्षी मात्र पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीचे चित्रच पालटले.
सातारा : गेल्यावर्षी सततचा आणि नोव्हेंबरमध्येही झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर ऊसतोडीचाही हंगाम लांबल्याने जिल्ह्यातील रब्बी पेरणी अद्यापही ७७ टक्क्यांपर्यंतच आहे. अजूनही काही भागात गव्हाची पेरणी होत आहे. त्यामुळे रब्बीची १०० टक्के क्षेत्रावर पेरणी होईल, याची श्वाश्वती नाही. तर यावर्षी टक्केवारीनुसार गहू आणि मकाची पेरणी ज्वारीपेक्षा अधिक झालीय.
दरवर्षी आॅक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामाची पेरणी सुरू होते. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात खरिपातील पिके काढल्यानंतर पेरणीस सुरुवात होते. सुरुवातीच्या काळात ज्वारीची पेरणी करण्यात येते. त्यानंतर गहू, हरभरा, मका पिकाची पेरणी करण्यात येते. गेल्यावर्षी मात्र पावसामुळे रब्बी हंगामातील पेरणीचे चित्रच पालटले. कारण, गेल्यावर्षी जुलै महिन्यापासून पश्चिम भागात सतत पाऊस सुरू झाला.
पूर्व भागात तर सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आॅक्टोबर महिन्यापर्यंत सतत कोसळत होता. त्यातच नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. त्यामुळे जमिनीत पाणी साठले. परिणामी आगाऊ पेरणी केलेलीही वाया गेली. त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सुरू केली. त्यामुळे पेरणीला उशिरा झाला. काही ठिकाणी ज्वारीची दुबार पेरणी झालीय. जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र २ लाख १४ हजार ८२३ हेक्टर असलेतरी आतापर्यंत १ लाख ६६ हजार ८७० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. त्यामुळे रब्बीची पेरणी जवळपास ७७ टक्के झालीय. त्यामध्ये ज्वारीची पेरणी ७७ टक्के, गहू ७८, मका ८६, हरभरा ७८ टक्के अशी प्रमुख पिकांची टक्केवारी आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त रब्बीचे क्षेत्र माण तालुक्यात २८ हजार ६५५ हेक्टर असून तेथे २५ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झालीय. म्हणजे यावर्षी माणमध्ये ज्वारी क्षेत्र कमी झाले आहे. खटावला २२ हजार हेक्टर क्षेत्र असलेतरी पेरणी फक्त ८ हजार ६०० हेक्टरवरच झालीय. फलटणला २१ हजारपैकी १८ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथील शेतकरी अन्य पिकांकडे वळले आहेत. गहू, हरभरा, मका अशी पिके यंदा येथील शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात घेतलीत. फलटण तालुक्यात तर गव्हाचे क्षेत्र जवळपास साडेपाच हजार हेक्टर आहे. या तालुक्यात गव्हाचं क्षेत्र वाढलंय. कारण, आतापर्यंत तालुक्यात साडेसहा हजार हेक्टरच्या वर गव्हाचे क्षेत्र झाले आहे. खंडाळ्यात गव्हाची १०० टक्के क्षेत्रावर पेरणी झालीय. वाईमध्येही गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. सातारा, जावळी आणि कºहाडमध्ये गव्हाच्या क्षेत्रात घट झाली आहे.
कोरेगाव, खटाव, माण, फलटण या तालुक्यांत मका क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. हरभºयाची पेरणी सातारा, जावळी, कºहाड, खटाव आणि माणमध्ये कमी झालीय. तर कोरेगाव आणि फलटणमध्ये हरभºयाचे क्षेत्र वाढले आहे.
- ऊस लवकर न गेल्याने राने मोकळी नाहीत...
दरवर्षी नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो. त्यामुळे उसाला वेळेत तोड येते. गेल्यावर्षी मात्र, डिसेंबरपर्यंत कारखाने सुरूच होत होते. त्यामुळे उसाची तोडणी लवकर झाली नाही. परिणामी ऊसतोडणीनंतर काही शेतकरी रब्बी हंगामातील पिके घेतात; पण ऊसच वेळेत न गेल्याने राने मोकळी झाली नाहीत. त्यामुळे त्यांना पेरणी वेळेत करता आली नाही. आता असे शेतकरी उन्हाळी पिके घेऊ शकतात.