मजुरांच्या श्रमापेक्षा यंत्रासाठी अधिक मोबदला; ऊसतोडणी मजुरांचे प्रश्न जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:00 PM2018-11-18T23:00:22+5:302018-11-18T23:00:26+5:30
विकास शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क मलटण : कारखान्यांची धुराडी पेटली की गळीत हंगामाची धामधूम सुरू होते आणि या ...
विकास शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलटण : कारखान्यांची धुराडी पेटली की गळीत हंगामाची धामधूम सुरू होते आणि या प्रक्रियेत ऊस उत्पादक कारखानदार आणि ऊसतोडणी मजूर यांची एक साखळी असते, हे सर्वजण एकमेकांवर अवलंबून असतात. त्यातच शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आपापली गणित मांडत असतात; पण साखर उत्पादनातील तिन्ही घटकांना असणाऱ्या समस्यांवर एका ठिकाणी कोणच बोलत नाही. परिणाम साखर उत्पादनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्या सोडविण्यासाठी सर्वसमावेशक उत्पादक कारखानदार व मजूर या घटकांचा विचार कोणीही करत नाही.
पश्चिम महाराष्ट्र म्हणजे ऊस उत्पादकांचा जिल्हा. कोल्हापूर, सांगलीपेक्षा सातारा जिल्ह्यातील कारखान्यांची धामधूम अधिक असते. त्यामुळे इथं समस्याही अनेक प्रमाणात आहेत. पण त्या सोडविण्याऐवजी अधिक वाढत जात आहे. दरवर्षी शेतकरी संघटना आंदोलन करतात. मागण्या मान्य होईपर्यंत तणावाचे वातावरण असते. करखान्यापासून उसाच्या फडापर्यंत संघर्ष वाढत गेलेला दिसतो.
समन्वय काढून तडजोड केली जाते; पण ही तात्पुरती डागडुजी म्हणता येईल, कारण आंदोलन आणि संप करण्याची वेळ दरवर्षीच येत आहे. कायमस्वरुपी समस्या सोडविली जात नाही किंबहुना ती सोडवायचीच नसते. त्यामुळे उत्पादकांनी शेतात राबायचे कारखानदारांनी प्रचंड कर्ज काढून कारखाने चालवायचे आणि ऊसतोड मजुरांनी फक्त पोट भरेल एवढेच कमवायचे, बाकीचे मात्र या तिन्ही घटकांना झुंजत ठेवून आपला हेतू साध्य करत असतात.
यामधील सर्वात वंचित घटक म्हणजे ऊसतोडणी कामगार हाच असतो. त्यांच्याही आता संघटना आहेत; पण त्याचे प्रश्न कायमस्वरुपी कधीच सुटले नाहीत. दिवसेंदिवस या समस्या वाढत जातात. ऊसतोडणी मजुरांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे त्यांना मिळणारा मोबदला दिवसभर उन्हातान्हात कोयत्यासह राबवून दिवसाला तीन टन ऊस तोडला जातो आणि या मोबदल्यात या मजुरांना म्हणजेच जोडीला मिळतात फक्त एकशे नव्वद ते दोनशे रुपये. यात दहा-वीस रुपये वाढ होत असते.
म्हणजेच पहाटे पाचपासून संध्याकाळी गव्हाणीत मोळी पडेपर्यंत या ऊसतोडणी मजुरांना कष्ट करावे लागतात आणि त्यांना मिळतात फक्त सहाशे रुपये. म्हणजेच एका मजुराला तीनशे रुपये फक्त गेल्या दोन-तीन वर्षांपासून फलटण तालुक्यात हार्व्हेस्टर मशीन काही कारखान्यांनी आणल्या आहेत. या मशीनला प्रतिटन अंदाजे चारशे रुपये भाडे द्यावे लागते. यावरूनच मजुरांच्या श्रमापेक्षा यंत्रासाठी अधिक मोबदला दिला जातो.
सातारा जिल्ह्णात अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर पाठोपाठ सर्वाधिक साखर कारखाने सातारा जिल्ह्णात येतात. फलटण तालुक्यात मोठ्या गाळप क्षमतेचे तब्बल चार कारखाने आहेत. बीड, उस्मानाबाद, अहमदनगर भागातून येणारे ऊसतोड कामगार पाठीवर बिºहाड घेऊन फिरत असतात. गळीत हंगामाची सहा महिने मजूर रानोमाळ भटकत असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्यासाठी ‘साखरशाळा’ सुरू करणारा पहिला जिल्हा म्हणून साताºयाचे नाव घेतले जाते. फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर या कारखान्यावर १९८० मध्ये पहिली साखरशाळा सुरू झाली. परंतु आज शासनाने या शाळांना मान्यता देऊन ही ऊसतोडणी मजुरांच्या शिक्षणाचा प्रश्न मिटला नाही. ऊस तोड मजुरांची हातावर मोजण्याइतके मुलं शिक्षण घेत आहेत.