कंपनीत भागिदारीच्या आमिषाने ६९ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 10:36 AM2019-11-28T10:36:52+5:302019-11-28T10:37:39+5:30
तिघांवर गुन्हा : शासकीय कंत्राटदाराची तक्रार लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मुंबईतील एका कंपनीत भागिदारी देण्याच्या आमिषाने एका शासकीय ...
तिघांवर गुन्हा : शासकीय कंत्राटदाराची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुंबईतील एका कंपनीत भागिदारी देण्याच्या आमिषाने एका शासकीय कंत्राटदाराची तब्बल ६९ लाखांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शैलेश दत्तात्रय जाधव (रा. मुंबई), संदीप दत्तात्रय जाधव (रा. पुष्पदत्त गणेश कॉलनी, सदर बझार सातारा), दत्तात्रय गेणू जाधव (रा. पंढरपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विजय श्रीरंग शेलार (रा. सदर बझार सातारा) हे शासकीय कंत्राटदार आहेत. संबंधित संशयित त्यांच्या ओळखीचे होते. या ओळखीतून संशयितांनी विजय शेलार यांच्या मुलाला मुंबई येथील एका कंपनीत भागिदार करून घेण्याचे आमिष दाखविले. या बदल्यात त्यांच्याकडून ६९ लाख ७० हजारांची रोकड घेतली. परंतु बरेच दिवस झाले तरी संबंधित संशयित मुलाला कंपनीत भागिदार करून घेत नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेलार यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले. परंतु पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कोणालाही अटक झाली नव्हती.