निरा-देवघरच्या पाण्यासाठी १० जुलैला प्रांत कार्यालयावर मोचार् : निंबाळकर
By admin | Published: June 30, 2017 01:29 PM2017-06-30T13:29:09+5:302017-06-30T13:29:09+5:30
पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बोलविलेल्या बैठक
आॅनलाईन लोकमत
फलटण , दि. ३0 : निरा-देवघरच्या पाण्यासाठी आता आरपारची लढाई करण्याची वेळ आली आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात १० जुलैला निरा देवघरच्या लाभ क्षेत्रातील ग्रामस्थांच्या वतीने प्रांत कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढला जाईल, असा इशारा माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी दिला.
निरा-देवघर धरणाच्या पाण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी अॅड. बाळासाहेब बागवान, कृष्णा खोरे विकास महांमडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, नानासाहेब राणे, अमोल खराडे, सिराज शेख, अमित रणवरे, राजेंद्र काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंदुराव नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, ज्या तालुक्यासाठी हे धरण झाले ते तालुके पाण्यापासून वंचीत आहेत. तर ज्याचा या पाण्याशी काही संबध नाही ते बारामतीकर आपल्या हक्काचे ६० टक्के पाणी वापरत आहेत. तालुक्यातील जनतेच्या मतांवर जे निवडूण आले त्या लोकप्रतिनिधींनी स्वत:च्या राजकीय स्वाथार्साठी तालुक्याचे पाणी पळविण्यास मदत केली. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आत्ता संघर्ष केला नाही तर हक्काचे पाणी सोडुन द्यावे लागेल. त्यामुळे सरकारवर दबागट निर्माण करून या धरणाचे पाणी आपल्या शिवारात आणण्यासाठी लाभक्षेत्रातील गावांनी आरपारच्या लढाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. त्यासाठी १० जुलैला फलटण प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.
अॅड. नरसिंह निकम म्हणाले, निरा देवघर बाबत तालुक्यातील जनतेला जागे करण्याचे काम आम्ही केले आहे. आता ही लढाई तुमची झाली असुन पाणी शिवारात आणल्या शिवाय हे आंदोलन थांबणार नाही. यावेळी माळशिरस निरा देवघर संघर्ष समितीचे अध्यक्ष नानासाहेब राणे, अमोल खराडे, राजेंद्र काकडे, अमित रणवरे, विक्रम शिंदे, तुकाराम शिंदे, आत्माराम सस्ते, प्रल्हाद लावंड यांनी मनोगत व्यक्त केला.
त्यांचा रिमोट बारामतीकडे : बागवान
अॅड. बाळासाहेब बागवान म्हणाले, ज्या पाणी प्रश्नावर १९९५ साली रामराजे आमदार झाले ते आता या प्रश्नी काहीच बोलत नाहीत. कारण त्यांचा रिमोट बारामतीकडे आहे. निरा देवघरच्या कालव्यांच्या कामकाजाविरोधात कृष्णा खोरे विभागाकडे तक्रारी करणारे राष्ट्रवादीचेच बगलबच्चे असल्याचा आरोप यावेळी बागवान यांनी केला.
तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही.. : निंबाळकर
रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, निरा देवघरच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला असुन पाणी आल्या शिवाय आता तो थांबणार नाही. संघर्ष समिती आदोलनांबाबत जो निर्णय घेईल त्या प्रमाणे आपल्याला आंदोलनात सहभागी व्हावे लागणार आहे. येणाऱ्या पिढीला पाणी देण्याची जबाबदारी आपली आहे. आता प्रत्यकाने या आंदोलनात निरा देवघरचा जलदुत म्हणुन सहभागी व्हावे.