पाटणमध्ये सर्वात जास्त अवघड क्षेत्रातील शाळा
By admin | Published: April 12, 2017 03:20 PM2017-04-12T15:20:03+5:302017-04-12T15:20:03+5:30
हरकतींसाठी सात दिवसांची मुदत : सातारा तालुक्यात केवळ १४ शाळांची नोंद
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. १२ : शिक्षक बदलीच्या अनुषंगाने अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा परिसरातील शाळांच्या याद्या प्रशासनाने तयार केल्या आहेत. त्यामध्ये पाटण तालुक्यातील २२६ इतक्या सर्वात जास्त शाळा अवघड क्षेत्रात नोंदल्या गेल्या आहेत. तर माण तालुक्यातील केवळ ९ शाळांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील २ हजार ७१६ शाळांपैकी तब्बल ५२८ शाळा या दुर्गम (अवघड) क्षेत्रात असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी जाहीर केले. उर्वरित २ हजार १८८ शाळा सुगम (सर्वसाधारण) क्षेत्रात असणार आहेत. त्यानुसारच शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
शासनाने १५ मे २०१४ रोजी शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबत शासन आदेश काढला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सुगम व दुर्गम गावे निश्चित करण्याचे काम सुरू असून, सुगम भागातील जास्तीत जास्त गावे दुर्गम प्रकारात बसावीत, यासाठी शिक्षक मंडळींनी राजकीय फिल्डिंग लावल्याची जोरदार चर्चा होती.
शिक्षकांच्या बदल्या तालुक्यांतर्गत होत होत्या. शासनाच्या नव्या आदेशानुसार आता शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण जिल्हा स्तरावरून ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्यांचे पूर्ण अधिकार असणार आहेत.
ज्या शिक्षकांनी दहा वर्षे व त्यापेक्षा जास्त अधिक काळ सुगम भागात सेवा बजावली आहे, त्यांची बदली दुर्गम भागात केली जाणार आहे. तर ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावली आहे, त्या शिक्षकांना सुगम भागात सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.
दरम्यान, येत्या सात दिवसांत या याद्यांवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांच्याकडे हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर पाच दिवस पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे हरकती नोंदविता येतील. त्यानंतर शिक्षक बदल्यांची कार्यवाही केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
याद्या सोशल मिडियातून व्हायरल
अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्रातील गावांच्या तालुकानिहाय याद्या सोशल मिडियावरुन व्हायरल होऊ लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरही या याद्या पाहायला उपलब्ध असल्याने बदलीच्या प्रतीक्षेत असणारे शिक्षक आॅनलाईन बिझी झाले आहेत.
माण : ८
खटाव : ९
पाटण : २२६
फलटण : १९
सातारा : १४
कोरेगाव : १३
महाबळेश्वर : ११०
वाई : ३६
खंडाला : १०
जावळी : १९०
कऱ्हाड : १३