पर्यंतीच्या माय-लेकींचा खून दागिन्यांसाठीच; मध्य प्रदेशमधील दोघांना अटक
By दत्ता यादव | Published: December 24, 2023 09:31 PM2023-12-24T21:31:49+5:302023-12-24T21:32:18+5:30
पोलिसांच्या तपासात उघड
सातारा : माण तालुक्यातील पर्यंती येथील माय-लेकींच्या खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांना यश आले असून, हा खून चोरीच्या उद्देशाने दागिने लुटण्यासाठी झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी मध्य प्रदेशमधील दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे.
संदीप शेषमनी पटेल (वय ३०, रा. परसिधी कारोल खुर्द, सिधी सिहवाल राज्य मध्य प्रदेश), अजितकुमार रामकिशोर पटेल (२९, रा. परसिधी, सिधी सिहवाल, राज्य मध्य प्रदेश) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पर्यंती (ता. माण) येथील संपताबाई लक्ष्मण नरळे (७५), नंदाबाई भिकू आटपाडकर (५८) या माय-लेकींचा २० डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञाताने गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस ऑंचल दलाल, दहिवडीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मध्यवस्तीत त्यांचे घर असताना हा खून झाल्याने माण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली होती.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या पथकाने आजूबाजूच्या लोकांकडे चाैकशी केली. मात्र, पोलिसांना ठोस माहिती मिळू शकली नाही. रविवार, दि. २४ रोजी दुपारी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना खास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, परराज्यातील रहिवासी पर्यंती गावात राहत असून, ते जेसीबी चालक आहेत. त्या दोघांनी माय-लेकींचा खून केला आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी दोघींच्या गळ्यातील दागिन्यांसाठी खून केला असल्याची कबुली दिली.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक ऑंचल दलाल, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, अतीश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, अमोल माने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, अमित माने, अविनाश चव्हाण, मोहन पवार, ओमकार यादव, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, स्वप्नील कुंभार, अजय जाधव आदींनी या कारवाईत भाग घेतला.
केवळ बोरमाळ अन् कर्णफुले
माय-लेकींच्या गळ्यात जास्त दागिने नव्हते. बोरमाळ आणि कानातील दागिने एवढेच होते. केवळ या दागिन्यांसाठी दोघा तरुणांनी या माय-लेकींचा जीव घेतला, असे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे.