आई बिनविरोध तर मुलगा लढून जिंकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:38 AM2021-01-20T04:38:10+5:302021-01-20T04:38:10+5:30
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील बिचुकले ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत माय-लेकराने वियजश्री खेचून आणली. शीला परशुराम पवार बिनविरोध निवडून आल्या ...
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील बिचुकले ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत माय-लेकराने वियजश्री खेचून आणली. शीला परशुराम पवार बिनविरोध निवडून आल्या असताना त्यांचा मुलगा सिद्धेश परशुराम पवार याने निवडणुकीत ३३ मतांनी विजय मिळविला.
गावच्या सर्वांगीण विकासाला गतिमान करण्यासाठी सत्तर वर्षांनंतर कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावाने निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. याला अपेक्षित यश मिळाले. मात्र दोन उत्साही उमेदवारांमुळे दोन जागांसाठी निवडणूक लागली आणि गावाचे वातावरणच बिघडून गेले. जलयुक्त शिवारसारखी महत्त्वपूर्ण योजना लोकसहभागातून राबविणारे बिचुकले गाव अल्पावधीत या कामातून नावारूपास आले.
यंदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित बैठक घेऊन राष्ट्रवादीला चार, काँग्रेसला आणि भाजपला दोन अशा जागा वाटून हा तिढा सोडवला. यानुसार नऊ जागांसाठी नऊ अर्ज भरण्याचे नियोजन करण्यात आले. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रभाग दोन व तीनमध्ये राजकीय खलबते झाली. यामुळे या दोन प्रभागांतील दोन जागांसाठी भाजपविरोधी राष्ट्रवादी अशी निवडणूक लागली तर उर्वरित सात जागा बिनविरोध निवडून आल्या.
गावातील प्रभाग तीनमधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून शीला परशुराम पवार या अगोदरच बिनविरोध निवडूून आल्या असताना त्यांचा मुलगा सिद्धेश परशुराम पवार हा याच प्रभागातून सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून ३३ मतांनी निवडून आला. त्यामुळे एकाच प्रभागातून आई व मुलगा दोघेही ग्रामपंचायत सदस्य बनले. या वाटाघाटीत भाजपची जागा मात्र घटली.