मातृदिनादिवशीच आईचा मुलाच्या डोळ्यांदेखत मृत्यू
By admin | Published: May 14, 2017 10:51 PM2017-05-14T22:51:18+5:302017-05-14T22:51:18+5:30
लग्नाला जाताना घडली घटना; ट्रकचालकावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : देशभर मातृदिन साजरा होत असतानाच मातृदिनादिवशीच आईचा मुलाच्या डोळ्यादेखत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देऊर (ता. कोरेगाव) जवळ रविवारी सकाळी सात वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शैलेश प्रदीप सपकाळ (वय २८, रा. लोणंद, ता. फलटण) हा आई प्रविणा (५१) यांच्यासोबत चिपळूण, जि. रत्नागिरी येथे मावशीच्या मुलाचे लग्न असल्याने दुचाकीवरून निघाला होता. लोणंदहून वाठार मार्गे साताऱ्याकडे येत असताना देऊर गावच्या हद्दीत आल्यानंतर तुरळक पाऊस सुरू झाला. त्यामुळे शैलेशने दुचाकी थांबविली. रस्त्याच्याकडेला दुचाकी उभी करून तो झाडाखाली उभा राहिला तर आई गाडीजवळ उभी होती. याचवेळी वाठार बाजूकडून आलेल्या भरधाव ट्रकने (एमएच १२ एलटी ९६९७) गाडीसह आईला जोरदार धडक दिली. यामध्ये आई प्रविणा या गंभीर जखमी झाल्या. शैलेशने इतर नागरिकांच्या मदतीने खासगी वाहनाने आईला लोणंद येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच आईचा मृत्यू झाला.
वाठार पोलिस ठाण्यात ट्रक चालक गणेश सर्जेराव खेडकर (रा. घोघास पारगाव, ता. शिरूर, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.