मुलाचा खून करणाऱ्या मातेला जन्मठेप
By admin | Published: June 12, 2015 11:20 PM2015-06-12T23:20:18+5:302015-06-13T00:15:02+5:30
फलटणमधील घटना : दिराच्या लग्नात अडथळा येईल या भीतीने कृत्य
सातारा : मोठ्या दिराच्या लग्नात अडथळा येईल, या भीतीने स्वत:च्याच मुलाचा निर्घृण खून करणाऱ्या सुप्रिया अमित मोरे (रा. वारुंजी हिंजवडी, पुणे) या मातेला दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी जन्मठेप व दोन हजार रुपये दंड, दंड न दिल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, सुप्रियाचा प्रेमविवाह झाला होता. मोठ्या दिराच्या लग्नापूर्वीच त्यांनी लग्न केले होते. त्यामुळे मोठ्या दिराचे लग्न ठरत नव्हते. लग्नानंतर काही महिन्यांत सुप्रिया गरोदर राहिली. त्यामुळे ती विडणी (ता. फलटण) येथे आली होती. तिला मुलगा झाला. त्या मुलाचे नाव ‘रुद्र’ असे ठेवण्यात आले. मात्र सासू, सासरे तिच्याशी नीट बोलत नव्हते.
आताच आपल्याला अशी वागणूक मिळत आहे, तर माझ्या मुलाला भविष्यात नीट वागणूक देतील का? असेही तिच्या डोक्यात विचार यायचे. तसेच मोठ्या दिराच्या लग्नापूर्वी स्वत:चे लग्न झाल्यामुळे मोठ्या दिराच्या लग्नात अडथळा येईल, याचीही तिला भीती होती. त्यामुळे तिने दि. ६ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी सव्वादोन वाजता घरात कोणी नसताना रुद्रला घराबाहेर असलेल्या पाण्याच्या बॅरेलमध्ये टाकले.
त्यानंतर रुद्रचे तीन अनोळखी व्यक्तींनी अपहरण केल्याची तक्रार तिने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. मात्र, पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर आपणच आपल्या मुलाचा खून केल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली होती.
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने सुप्रिया मोरे हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सहायक सरकारी वकील मिलिंद पवार यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे अविनाश पवार, अयुब खान, नंदा झांजुर्णे, संजय पवार यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
केवळ नऊ महिन्यांत निकाल
सुप्रिया मोरे हिने आपल्या पोटच्या मुलाचा खून नऊ महिन्यांपूर्वी केला होता. या खटल्याची न्यायालयामध्ये महिन्यातून दोन ते तीनवेळा सुनावणी होत होती. जलदगतीने कामकाज सुरू होते. त्यामुळेच केवळ नऊ महिन्यांत या खटल्याचा निकाल लागला.