मोटार वाहन निरीक्षक मंजूषाला भावली सुरांची संगत!
By admin | Published: January 15, 2016 11:04 PM2016-01-15T23:04:40+5:302016-01-16T00:29:26+5:30
‘ड्यूटी’ सांभाळत दररोज होतोय सराव : तालबद्ध संगीताला त्यांच्याच सुरांची साथ; गिटार, हार्माेनियममधून उमटतायत स्वर वर्दीतील दर्दी
संजय पाटील -- कऱ्हाड --वाद्यावर बोटं थिरकली की संगीत उमटतं; पण या संगीताला लय असावी लागते. ताल असावा लागतो. तालबद्ध संगीतच मनाला भावतं. असंच मनाला भावणारं संगीत सध्या एका शासकीय अधिकाऱ्याच्या वाद्यातून उमटतंय. या संगीताला त्यांच्याच सुरांची साथही मिळतेय, हे विशेष !
मंजूषा भोसले. कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहायक मोटार वाहन निरीक्षक़ फलटण हे मंजूषा भोसलेंचं मूळ गाव. त्याचठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. वडील प्रभाकर भोसले हे शासकीय नोकरीत असल्याने त्यांच्या बदलीच्या ठिकाणी कुटुंबाला स्थायिक व्हायला लागायचं. बदलीचा कालावधी तीन ते चार वर्षांचा. पुन्हा बदली झाली की तीच तऱ्हा. एका शहरातून दुसऱ्या शहरात आणि दुसऱ्यातून तिसऱ्या; पण हे करीत असताना प्रभाकर भोसले यांनी त्यांचा छंद जोपासला. घरी हार्माेनियम होता. त्याच्यावरच ते रियाज करायचे. पुढे हळूहळू मंजूषा यांनाही संगीताची आवड निर्माण झाली. भाऊ अभिजित हासुद्धा हार्माेनियम शिकला.
पिंपरी चिंचवड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून मंजूषा यांनी मेकॅनिकल इंजिनिअर ही पदवी ग्रहण केली. तसेच कुसरो वाडिया महाविद्यालयात डिप्लोमा केला. या कालावधीत त्यांनी संगीत आणि गायनाचा सरावही सुरू ठेवला. महाविद्यालयांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या. तसेच टिळक विद्यापिठाअंतर्गत आयोजित शास्त्रीय संगीताच्या तीन परीक्षाही त्यांनी दिल्या. कार्यक्रमांतील सहभाग, दररोजचा सराव आणि त्याला लाभलेली परीक्षांची साथ, यामुळे मंजूषा यांनी वादन आणि गायनात महाविद्यालयामध्ये नाव कमावले. मात्र, वडिलांच्या बदलीमुळे मंजूषा यांना आपला हा छंद करिअर म्हणून निवडता आला नाही. या कलेला वेळ देणे गरजेचे होते. वेळ देता आला असता तर कदाचित गायन आणि वादनातच करिअर केलं असतं, असं मंजूषा यांना वाटतं.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मंजूषा स्पर्धा परीक्षांमध्ये उतरल्या. या परीक्षांची तयारी करताना जास्तीत जास्त वेळ त्यांनी अभ्यासाला दिला. त्यामुळे काही कालावधीसाठी त्यांचे या छंदाकडे दुर्लक्ष झाले. पुढे परिवहन विभागात त्या रुजू झाल्या. कऱ्हाडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात त्यांची नेमणूक झाली आणि ड्यूटी सांभाळतानाच त्यांनी हा छंद जोपासण्यास सुरुवात केली.
सध्या मंजूषा या कऱ्हाडमध्ये वास्तव्यास आहेत. ड्यूटीची वेळ संपवून घरी गेल्यानंतर ते किमान एक तास गायन आणि वादनाचा सराव करतात. सरावासाठी घरातीलच एक खोली त्यांनी निवडली आहे. निरव शांतता आणि बंदिस्त खोलीत संगीत तसेच वाद्यांचा प्रतिध्वनी उमटत असल्याने ही बाब सरावासाठी पोषक असते, असे मंजूषा यांचे म्हणणे आहे.
‘सरावासाठी दररोज एक तास ठरलेला असतो; मात्र एखाद्या दिवशी सराव करताच आला नाही तर अस्वस्थ वाटतं. घरात गिटार, हार्माेनियम, ढोलकी, चाळ व करावके सिस्टम आहे. या साधनांतून उमटणारा सूर आवाजाला भिडल्यानंतर निर्माण होणारा सूर आणि तालाचा संगम मोहकच असतो, असंही मंजूषा सांगतात.
तालबद्ध गाण्यांची आवड
सध्या रिमिक्सचा जमाना आहे; पण जुनी हृदयाला भिडणारी गाणी अजरामर आहेत. मंजूषा यांनाही याच गाण्यांची आवड आहे. लता मंगेशकर व श्रेया घोषाल या त्यांच्या आवडत्या गायिका. एकाच पठडीतील गाणी म्हणण्यापेक्षा सर्व प्रकारची गाणी गाता यावीत, असा मंजूषा यांचा संकल्प आहे.