मूकबधिर मुलीवरील अत्याचारप्रकरणी मोर्चा!
By admin | Published: March 15, 2015 12:17 AM2015-03-15T00:17:24+5:302015-03-15T00:17:24+5:30
फलटणमध्ये तणाव : दोन आरोपींना अटक
फलटण : शहरातील अठरा वर्षीय दलित मूकबधिर तरुणीला उचलून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी फलटणमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढला. दरम्यान, याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली.
पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी
(दि. १२) दुपारी एक ते सात या वेळेत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी संबंधित मूकबधिर तरुणीला उचलून अज्ञात ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करून तिला वडगाव निंबाळकर (ता. बारामती, जि. पुणे) या गावच्या हद्दीत सोडून दिले. याप्रकरणी सूरज शंकर जाधव
(वय २३) व धर्मराज पुजारी-जाधव (२२, दोघे रा. सोमवार पेठ, फलटण) यांच्यावर गुन्हा नोंद केला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना कडक शिक्षा करण्याच्या मागणीसाठी विविध संघटनांनी मोर्चा काढला. हा मोर्चा शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौक, महावीर स्तंभ मार्गे अधिकारगृहावर गेला. याबाबतचा तपास कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड करीत आहेत. (प्रतिनिधी)
कार्यालयासमोर गोंधळ
प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव हे लोकअदालतीला गेले असल्याने मोर्चाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी प्रतिनिधी पाठविला. मात्र, मोर्चेकऱ्यांनी केवळ प्रांताधिकाऱ्यांनाच निवेदन देण्याची भूमिका घेतली.
त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. शेवटी प्रांताधिकारी जाधव यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारले.