‘माउली’ फलटण तालुक्यात !

By admin | Published: July 6, 2016 11:26 PM2016-07-06T23:26:43+5:302016-07-07T00:51:22+5:30

तरडगावी मुक्काम : लोणंदकरांकडून निरोप; सनई-चौघडा बैलगाडीचाही सहभाग

'Mouli' in Phaltan taluka! | ‘माउली’ फलटण तालुक्यात !

‘माउली’ फलटण तालुक्यात !

Next

सचिन गायकवाड-- तरडगाव -हरिनामाचा गजर आणि विठ्ठल-रखुमाईच्या भावरसात माउलींच्या पालखी सोहळ्याने एक दिवसाच्या मुक्कामानंतर बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास लोणंदमधून तरडगाव, ता. फलटणकडे प्रस्थान केले. माउलींना निरोप देण्यासाठी संपूर्ण लोणंदनगरी जमा झाली होती. सनई, चौघडा वाजविणारी बैलगाडीही यामध्ये सहभागी होती.
दरम्यान, सायंकाळी चांदोबाचा लिंब येथे पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडल्यानंतर वैष्णवांचा मेळा तरडगावात विसावला. सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पालखीचे स्वागत करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने लोणंद येथील एक दिवसाच्या मुक्कामानंतर दुपारी प्रस्थान केले. त्यापूर्वी माउलींची आरती करण्यात आली. सकाळपासूनच न्याहरीबरोबर दुपारच्या जेवणाची तयारी दिंड्यांमध्ये सुरू होती. दिंड्यांमधील वारकरी जेवण उरकून पांढरे शुभ्र धोतर, पायजमा, नेहरू शर्ट, गळ्यात तुळशीमाळ, कपाळी गोपीचंद-टिळा, हाती टाळ व खांद्यावर भागवत धर्माचे पताका घेऊन पालखी तळावर जमा होत होते. विणेकरी माउलींच्या दर्शनासाठी आतुर झालेले दिसत होते. तसेच दिंड्यांचे ट्रक व अन्य वाहने तरडगावकडे मार्गस्थ होत होती. पहाटेपासूनच वारीत चालणारे वारकरी चांदोबाच्या लिंबकडे जिथे माउलींचे पहिले उभे रिंगण होते तिथे जाण्यासाठी उत्स्फूर्त होते.
पालखी तळावर सकाळपासून महिला व पुरुष वारकरी, भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. माउलींची पालखी ठेवण्यात येणारा रथ विविध रंगांच्या फुलांनी आकर्षितरीत्या सजविण्यात आला होता. भाविक माउलींच्या पादुकाबरोबर रथाचेही दर्शन घेत होते. दुपारी एकच्या दरम्यान प्रस्थानाची तयारी सुरू झाली. आरती होताच अश्व मार्गस्थ झाले. त्यानंतर लोणंदमधील नागरिकांनी पालखी खांद्यावर घेतली. हरिनामाचा गजर करत रथामध्ये ठेवण्यात आली. माउलींच्या रथापुढे मानाच्या दिंड्या होत्या. तर पुढे सनई-चौघडा वाजवण्यात येणारी बैलगाडी होती. त्यामागे चोपदारांबरोबर अश्व चालत होते. रथाच्या मागे अधिकृत दिंड्यांचे वारकरी चालत होते. माउलींचा रथ गांधी चौक, शास्त्री चौक मार्गे तरडगावकडे मार्गस्थ झाला. दुपारी अडीचच्या सुमारास पालखी सोहळ्याने कापडगाव, ता. फलटण गावच्या हद्दीत प्रवेश केला. सरपंच राजेंद्र पवार, उपसरपंच लक्ष्मण मदने यांच्यासह ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. रथातून बाहेर घेतलेली पालखी तरुणांनी खांद्यावर घेत गावाच्या प्रवेश द्वारातून आत नेली. विठ्ठल मंदिर, पवार मळा, चाफळकर वाडा, बापूबुवा मठ येथे पादुकांचे पूजन झाले. तरडगावमधील एक दिवसाचा मुक्काम आटोपून सोहळा फलटणकडे प्रस्थान करणार आहे.


लोणंदकरांकडून
वारकऱ्यांना जेवणावळी
माउलींच्या वारीत सहभागी लाखो वारकऱ्यांसाठी लोणंदकरांनी उत्स्फूर्तपणे जेवणाच्या पंक्ती घातल्या. येथील ग्रामस्थ, व्यापारी, पदाधिकारी यांनी यथायोग्य वारकऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानली.
सभापती तळ ठोकून
लोणंदमध्ये माउलींच्या पालखीचे आगमन झाल्यापासून प्रस्थान
होईपर्यंत खंडाळा पंचायत समितीचे सभापती नितीन भरगुडे-पाटील हे पंचायत समितीच्या आरोग्य, पाणीपुरवठा व इतर सुविधा वारकऱ्यांना ताबडतोब मिळव्यात यासाठी स्वत: लक्ष ठेवून लोणंदमध्ये तळ ठोकून होते.

Web Title: 'Mouli' in Phaltan taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.