धनावडेवाडीकरांच्या डोक्यावर आपत्तींचा डोंगर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:41 AM2021-07-27T04:41:13+5:302021-07-27T04:41:13+5:30
ढेबेवाडी : ‘पावसाचा जोर कमी झाला असला तरी ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर डोंगर कोसळण्याबरोबरच जमिनींना भेगा पडण्याचे प्रमाण वाढले ...
ढेबेवाडी : ‘पावसाचा जोर कमी झाला असला तरी ढेबेवाडी विभागातील वाल्मीक पठारावर डोंगर कोसळण्याबरोबरच जमिनींना भेगा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच घरांनाही तडे जाऊन घरे खिळखिळी बनल्याने धनावडेवाडी (निगडे) ता. पाटण येथील ३२ कुटुंबांतील ८० नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत सुरक्षितस्थळी हलविण्यात प्रशासनाला यश आले.
गेल्या आठवडाभरापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पाटण तालुक्यात हाहाकार माजवला आहे. वादळी वाऱ्यासह दिवसरात्र तीन दिवस थैमान घातलेल्या पावसाने प्रशासनासह नागरिकांचीही झोप उडवून टाकली. ढेबेवाडी विभागातील वांग नदीकाठच्या गावासह काळगाव, जिंती आणि सणबूर खोऱ्यात मोठे नुकसान झाले. भातशेतीसह अन्य पिकेही वाहून गेली, तर डोंगर पठाराला जोडणारे बहुतेक सर्वच छोटे, मोठे पूल वाहून गेल्याने पाऊस थांबूनसुद्धा ही गावे संपर्कहीन झाली आहेत.
या विभागातील मराठवाडी धरणानजीक असलेल्या मेंढ गावाजवळ भूस्खलनाची घटना घडली. सुदैवाने येथे वस्ती नसल्याने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, जितकरवाडी येथे डोंगर कोसळण्याबरोबरच जमिनींनाही भेगा पडू लागल्याने दोन दिवसांपूर्वी येथील नागरिकांना जिंती येथे स्थलांतरित करण्यात आले. तोपर्यंत धनावडेवाडी (निगडे) येथे भूस्खलनाची घटना घडल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली होते. प्रशासनही येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून असतानाच येथील जमिनींसह घरांच्या भिंतीनाही अचानकपणे तडे जाऊ लागले. घरे खिळखिळी झाली. यामुळे पाटण महसूल विभाग, ढेबेवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी धनावडेवाडीतील नागरिकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी सकाळपासून ही मोहीम चालू केली. मात्र, वांग नदीला पूर असल्याने आणि येथील पूलही तुटल्याने मोठी कसरत करावी लागली. अक्षरशः पाण्याच्या मोठ्या प्रवाहातूनसुद्धा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वांना साखळी करून, तर काही वृद्धांना उचलून नदीपात्राबाहेर काढले. या सर्व नागरिकांना ढेबेवाडी येथील मंगल कार्यालयात स्थलांतरित करण्यात आले आहे.
फोटो
२४ढेबेवाडी
धनावडेवाडी येथील बत्तीस कुटुंबीयांना प्रशासनाने सोमवारी सुरक्षित ठिकाणी हलविले. (छाया : रवींद्र माने)