Priyanka Mohite: साताऱ्याच्या प्रियांका मोहितेने सर केलं जगातील तिसरे उंच कांचनगंगा शिखर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 06:31 PM2022-05-05T18:31:27+5:302022-05-05T18:49:53+5:30
सातारा : साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने जगातील तिसरे सर्वात उंच असलेले कांचनगंगा शिखर सर केले आहे. प्रियांकाने ...
सातारा : साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते हिने जगातील तिसरे सर्वात उंच असलेले कांचनगंगा शिखर सर केले आहे. प्रियांकाने ही मोहिम आज, गुरुवारी सायंकाळी चार वाजून ५२ मिनीटांनी फत्ते केली. तिच्या या यशस्वी मोहिमेनंतर तिच्या कुटुंबियांनी व साताऱ्यातील क्रीडाप्रेमींनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
तेनजिंग नोर्गे नॅशनल अॅडव्हेंचर अवॉर्ड २०२० प्राप्त करणाऱ्या प्रियांका मोहितेने आज, गुरुवारी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. यानंतर तिने बेस कॅम्पवर उतरण्यास सुरुवात केली आहे. लवकरच ती भारतात परतणार असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली.
अन्नपूर्णा शिखर सर करणारी पहिली महिला
अन्नपूर्णा शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला होती. कांचनजंगा माऊंटवरील यशानंतर प्रियंका ८००० मीटरपेक्षा जास्त उंचीची ५ शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली असल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
माउंट एव्हरेस्ट व के-२ यांच्यानंतरचे सर्वात उंच शिखर
कांचनगंगा हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के-२ यांच्यानंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात आहे. याची उंची ८,५८६ मी (२८,१६९ फूट) इतकी आहे. कांचनजंगा शिखर सर करण्यात महाराष्ट्रातून पुण्याचा गिर्यारोहक हर्षद राव हा पहिला ठरला होता.