गौण खनिजासाठी डोंगर पोखरले
By admin | Published: February 10, 2015 09:40 PM2015-02-10T21:40:41+5:302015-02-10T23:59:06+5:30
कऱ्हाड तालुक्यातील चित्र : महसूल विभागाचे दुर्लक्ष, कारवाई करणे गरजेचे
उंडाळे : मानवाकडून स्वहितासाठी निसर्गाच्या संपत्तीचा गैरवापर केला जातो. हे आजपर्यंत ऐकले तसेच पाहिलेही असेल. मात्र आता कऱ्हाड तालुक्यात ठिकठिकाणी डोंगर पोखरले जातायत. लहान-मोठ्या टेकड्यांवर उत्खनन होत असल्याने कालांतराने या टेकड्या नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डोंगर कपारीत विविध प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. त्याचबरोबर डोंगरातून माती, दगड यासारख्या खनिज संपत्तीही मिळतात. सध्या मात्र या गौणखनिजासाठी डोंगरच पोखरले जात असल्याचे दिसून येते. परिणामी, भविष्यात ‘डोंगर वाचवा’ अभियान राबविण्याची गरज निर्माण होईल. ज्यापद्धतीने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला जातो. तसाच संदेश आता पर्यावरणासह ‘डोंगर वाचवा’ यासाठीही द्यावा लागेल. ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी डोंगर पायथ्याला गौण खनिजाचे उत्खनन प्रचंड प्रमाणात केले जाते. विटा बनविणे तसेच बांधकाम करताना भराव घालण्यासाठी हे उत्खनन केले जात आहे. तसेच मोठे दगड खडी बनविण्यासाठी वापरले जातायत. डोंगरांचे प्रमाणापेक्षा जास्त उत्खनन केले जात असल्यामुळे पर्यावरणासाठी ते घातक ठरणार आहे.
मुळातच वृक्षतोड व इतर कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. अशातच डोंगर पोखरण्यास सुरूवात झाल्याने भविष्यात त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गौणखनिजाचे उत्खनन करणारे सध्या गबर झाले आहेत. महसुल विभागाने या गोष्टींचा विचार करून गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांना चाप लावणे गरजेचे आहे. (वार्ताहर)