महायुतीत माढा भाजपकडे; साताऱ्यासाठी रस्सीखेच, जिंकलेल्या जागा सोडण्याचे सूत्र
By नितीन काळेल | Published: March 13, 2024 07:50 PM2024-03-13T19:50:41+5:302024-03-13T19:51:37+5:30
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सातारा: लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागा वाटपावरुन जोरदार हालचाली सुरू असून माढ्यातून पुन्हा भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर साताऱ्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे पूर्वी जिंकलेल्या जागा पक्षांना सोडण्याचे सूत्र लागू झाल्यास सातारा राष्ट्रवादीच्या पदरात पडणार आहे. पण, राजधानीवरील अजित पवार गटाचा दावा टिकणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
राज्यात सातारा आणि माढा हे दोन्हीही लोकसभा मतदारसंघ लोकप्रिय आहेत. या मतदारसंघाचे नेतृत्व राज्याची धुरा पाहणाऱ्या मातब्बरांनी केले आहे. साताऱ्यातून महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण हे खासदार झाले. तर माढा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेतृत्व केले. आजही या दोन्ही मतदारसंघात मातब्बर आहेत. त्यामुळे मतदारसंघ उमेदवारी मिळण्यापासून मतमोजणी होईपर्यंत चर्चेत राहतात. त्यातच आता कोणत्याही क्षणी निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चीत करण्याची धडपड सुरू आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने मागील दोन वर्षांपासून मशागत सुरू केली. खासदार उदयनराजे भोसले हेच उमेदवार असणार हे स्पष्ट होते. पण, अजित पवार गट महायुतीत आल्यानंतर राजकीय समिकरणे बदलली. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच साताऱ्यावर दोन महिन्यांपूर्वीच दावा केलाय. त्यातच त्यांनी विद्यमान खासदार असलेल्या पक्षालाच जागा सोडण्यावर चर्चा झाल्याचेही एेकवले आहे. त्यामुळे अजित पवार साताऱ्यावरील दावा सोडणार नाहीत हे स्पष्ट होत आहे. कारण, राष्ट्रवादी प्रबळ असणाऱ्या मतदारसंघापैकी एक सातारा आहे. त्यामुळे अजित पवार यांना दुखावण्यापेक्षा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणे भाजप पसंद करेल, अशी विश्वसनीय माहिती मिळत आहे. तसेच दादा गटाकडून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याचेही जवळपास निश्चीत आहे.
माढा मतदारसंघ महायुतीतून भाजपच लढवत आली आहे. २०१४ ला युतीबरोबर असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत (आता रयत क्रांती संघटना) उभे राहिले होते. सध्या भाजपचेच रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे खासदार आहेत. त्यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास दाखवलाय. त्यांना काही प्रमाणात राजकीय विरोध होत होता. तरीही त्यांची राजकीय बेरीज अधिकच राहिलेली आहे. याचाच त्यांना फायदा झाला असून माढ्यासाठी पुन्हा भाजपची उमेदवारी मिळाली आहे. कारण, भाजपसमोर सर्वांना बरोबरीने घेऊन जाणारा त्यांच्यासारखा चेहरा नव्हता. यामध्ये अजित पवार गटातील विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बंधू संजीवराजेंसाठी लावलेला जोर निष्फळ ठरलेला आहे.
महाविकास आघाडीत साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार असणार हे स्पष्टच आहे. पण, उमेदवार कोण हे निश्चित नाही. महायुतीच्या उमेदवाराला जोरदार टक्कर द्यायची असेल तर विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशिवाय दुसरा चेहरा पक्षासमोर नाही. इतर काही नावे समोर येत आहेत. पण, सर्वजणच लोकसभेसाठी नवखे आहेत. त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघात चालणारे म्हणून विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. तरीही महायुतीत अजित पवार गटाला मतदारसंघ गेल्यास भाजपमध्ये काही उलथापालथी होण्याचे संकेत आहेत. ही उलथापालथ झाल्यास शरद पवार गटाला दुसराही उमेदवार मिळू शकतो. पण, हा जर-तरचा खेळ आहे.
जानकरांना हवेत माढ्याबरोबरच इतर दोन मतदारसंघ...
माढा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे माढ्याच्या तयारीत आहेत. स्वबळाचा नारा दिला असलातरी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचे संकेत आहेत. याबाबत त्यांची शरद पवार यांच्या बरोबर चर्चा झाल्याची तसेच त्यांना आघाडीतून माढ्याबरोबरच लोकसभेचे आणखी दोन मतदारसंघ हवे असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांची ही राजकीय इच्छा आघाडी पूर्ण करेलच असे नाही. परिणामी जानकर हे आघाडीबरोबर न गेल्यास शरद पवार गटाचा उमेदवार असणार आहे. सध्यातरी या गटाकडून अभयसिंह जगताप यांची पूर्ण तयारी झालेली आहे.