युवापिढीच्या पुढाकाराने रक्तदान बनली चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:08+5:302021-07-04T04:26:08+5:30

काही वर्षांपूर्वी रक्तदानाबाबत अनेक गैरसमज होते. त्यामुळे रक्तदान करायला कोणीही धजावत नव्हते. रक्तदानासाठी जनजागृती करावी लागत होती. मात्र, तरीही ...

The movement became a blood donation initiative of the youth | युवापिढीच्या पुढाकाराने रक्तदान बनली चळवळ

युवापिढीच्या पुढाकाराने रक्तदान बनली चळवळ

Next

काही वर्षांपूर्वी रक्तदानाबाबत अनेक गैरसमज होते. त्यामुळे रक्तदान करायला कोणीही धजावत नव्हते. रक्तदानासाठी जनजागृती करावी लागत होती. मात्र, तरीही त्याला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. शासकीय आणि अशासकीय पेढ्यांमध्ये ठरावीक प्रमाणातच रक्तसाठा उपलब्ध असायचा. कालांतराने परिस्थिती बदलली. अनेक जण स्वयंप्रेरणेने रक्तदान करू लागले. साहजिकच रक्तसाठा वाढायला सुरुवात झाली. मात्र, पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध होण्यासाठी रक्तदानाला चळवळीचे स्वरूप प्राप्त होणे गरजेचे होते. केवळ शिबिरात येऊन रक्तदान करणार्‍यांबरोबरच स्वेच्छेने अशी शिबिर आयोजित करून, त्यामध्ये इतरांना रक्तदानासाठी प्रेरित करणे आवश्यक होते आणि हेच काम तरुणपिढीने हाती घेतले.

गत काही वर्षांपासून तरुणांचे अनेक ग्रुप रक्तदान शिबिरांचे आयोजन करीत आहेत. काही ग्रुप तर केवळ रक्तदान करण्याच्या उद्देशानेच तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपमध्ये युवकांबरोबरच युवतींचाही सहभाग आहे. वेगवेगळ्या दिनाचे औचित्य साधून, या युवक-युवतींकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येतात. स्वतः रक्तदान करण्याबरोबरच ते इतरांनाही रक्तदानासाठी प्रेरित करतात. ज्यामुळे ब्लड बँकांना पुरेशा प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध होत आहे.

रक्तदान चळवळीत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरताना दिसत आहे. रक्तदान करणाऱ्या युवकांचे वेगवेगळे ग्रुप सोशल मीडियावर कार्यरत आहेत. या ग्रुपमध्ये दररोज कोणत्या रुग्णालयात कोणत्या रक्तगटाची आवश्यकता आहे, याची माहिती पाठविली जाते. आणि शक्य असणारे युवक-युवती संबंधित रुग्णालयात जाऊन तातडीने रक्तदान करतात. ज्यामुळे गरजू रुग्णाला तातडीने रक्त उपलब्ध होऊन त्याला जीवदान मिळते.

- संजय पाटील

- कोट

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. युवापिढीला रक्तदानाचे महत्त्व समजले असून, अनेक युवक व युवती स्वतःहून रक्तदान करण्यासाठी पुढे येतात. आमच्या ग्रुपमध्ये अनेक जण सहभागी असून, ते स्वयंप्रेरणेने रक्तदान शिबिरांमध्ये सहभागी होत आहेत. ही चळवळ आणखी व्यापक होणे गरजेचे आहे.

- परेश कांबळे, गरज रक्ताची संघटना

- चौकट

अनेकांना वाटते भीती

बहुतांश युवक-युवती निरोगी आयुष्य जगत असतात. त्यामुळे त्यांना इंजेक्शन घेण्याची कधीही गरज पडत नाही. त्यामुळे पहिल्यांदा रक्तदान करताना या युवक आणि युवतींना भीती वाटते. अनेक जण याच भीतीमुळे रक्तदान करणे टाळतात. मात्र, एकदा ही भीती दूर झाली की, रक्तदानासाठी ते स्वतःहून पुढाकार घेतात. सध्या अनेकांनी या भीतीवर मात केली असून, वारंवार रक्तदान शिबिरामध्ये ते सहभागी होत आहेत.

Web Title: The movement became a blood donation initiative of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.