‘तारळी’चा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन

By admin | Published: June 17, 2015 11:08 PM2015-06-17T23:08:57+5:302015-06-18T00:40:45+5:30

शिवेंद्रसिंहराजे भोसले : तीन महिन्यांत उपाययोजना आखण्याचे प्रशासनाचे आश्वासन

Movement if the question of 'stale' is not resolved | ‘तारळी’चा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन

‘तारळी’चा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन

Next

सातारा : ‘तारळी धरणासाठी सातारा तालुक्यातील ठोसेघर, पवारवाडी, मोरेवाडी, जांभे, चिखली, चोरगेवाडी, करंदोशी, बोपोशी आदी गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या; मात्र १५ वर्षे उलटूनही येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल,’ असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.
यानंतर प्रशासनाने संबंधित प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत मार्गी लावण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी तारळी प्रकल्पग्रस्तांना दिले.
सातारा तालुक्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. यासंदर्भात २०१३ मध्ये तत्कालीन पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सातारा तालुक्यातील तारळी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी येथील गावठाणात करून त्यांना सूर्याचीवाडी गावाच्या लगतच्या गावातील जमिनी देण्यास मान्यता देण्यात आली.
याबाबत अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही प्रशासनाकडून न झाल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी वाघमारे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा पंचायत समितीच्या सभापती कविता चव्हाण, तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील व अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी उपस्थित करून प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार नसेल, तर प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीत दिला. यानंतर जिल्हा पुनर्वसन अधिकारी वाघमारे यांनी ‘या प्रश्नावर तातडीने तोडगा काढू,’ असे सांगितले. मात्र, प्रश्न मार्गी लागण्यासाठी किती कालावधी लागेल, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. येत्या तीन महिन्यांत प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन खटाव तालुक्यात मान्यता मिळालेल्या ठिकाणी करण्याचे आश्वासन वाघमारे यांनी दिले.
या बैठकीस सीताराम गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, किसन पवार, संतोष गायकवाड, यशवंत बेडेकर, जोतिराम गायकवाड, शंकर गायकवाड यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Movement if the question of 'stale' is not resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.