Satara: धनगर आरक्षणासाठी खंबाटकी घाटात पाच तास महामार्ग रोखला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 03:18 PM2023-12-01T15:18:14+5:302023-12-01T15:19:42+5:30
खंडाळा (जि.सातारा) : धनगर समाज आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारी दुपारी पाच तास चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे सुमारे ...
खंडाळा (जि.सातारा) : धनगर समाज आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारी दुपारी पाच तास चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे सुमारे साठ किलोमीटर साताऱ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर पावणेसहा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले.
खंडाळा तालुक्यातील समाज बांधवांनी काही वर्षांपूर्वी साखळी उपोषण केले होते; मात्र शासन पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने लोणंद येथे गणेश केसकर यांनी उपोषण सुरू केले. गेल्या पंधरा दिवसांत या उपोषणाची दखल शासनाने घेतली नसल्याने धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलनाचा पर्याय निवडला आहे. या आंदोलनासाठी तालुक्यासह भागातील इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात धनगर समाजातील महिलांसह समाजबांधव जमले होते.
चक्का जाम आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना चाळीस पन्नास किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक लोणंद मार्गे वळविण्यात आली; मात्र तो मार्गही कोंडला होता. त्यामुळे पोलिस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते.
साताऱ्यापर्यंत वाहनांच्या रांगा..
आरक्षणाच्या मागणीसाठी महामार्ग रोखल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. खंडाळा ते सातारा आणि खंडाळा ते कात्रज पुणेपर्यंत दोन्ही बाजूला ५० किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा. आज महामार्ग रोखला आहे, उद्या मुंबईचे सर्व रस्ते अडवू. आरक्षणासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. राज्य सरकारकडे परिपत्रक काढण्यासाठी मागणी आहे; परंतु सरकारला जाग आणण्यासाठी समाजात जागृती झाली पाहिजे. धनगर समाजाला विचारात घेतले नाही तर अनेक विधानसभा मतदारसंघात आमच्याशिवाय आमदार जाऊ शकत. - गोपीचंद पडळकर, आमदार