विरोधी उमेदवारानंतरच हालचाली ! राष्ट्रवादी आमदारांची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:50 PM2019-03-15T23:50:47+5:302019-03-15T23:51:54+5:30
प्रगती जाधव-पाटील । सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, अद्यापही विरोधी उमेदवाराचे नाव ...
प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, अद्यापही विरोधी उमेदवाराचे नाव पुढे न आल्यामुळे राष्ट्रवादी आमदारांच्या गोटात तुलनेने शांतता आहे. समोर येणारा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, यावर आमदार पुढील रणनीती ठरवणार असल्याचं चित्र दिसत आहे.
सातारा लोकसभा मतदार संघात यावेळी अनेक हाय व्हॉल्टेज घटना घडल्या. उदयनराजेंना विरोध करण्यासाठी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत आमदार धडकले होते; पण सातारा जिल्ह्यात अद्यापही आपलाच शब्द प्रमाण मानला जात असल्याचे पवारांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले. पुण्यातील बैठकीत त्यांनी सर्वांना ‘नांदा सौख्यभरे’ सांगून कामाला लागण्याचा आदेश दिला.
सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठी आहे. पुण्यातील बैठकीनंतर उदयनराजे यांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. त्यांच्या वॉररूममध्ये निवडणुकीचं वारं घोंघावत असताना अन्य तालुक्यांमध्ये तुलनेने शांतता दिसत आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोणीही कार्यकर्त्यांची बैठक न लावल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. दरम्यान, गुरुवारी उदयनराजे समर्थकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वपक्षीय कार्यकर्ते उदयनराजे समर्थक म्हणून सहभागीही झाले; पण त्यात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती नगण्य अशीच होती.
राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात युतीचा कोणता उमेदवार उभा राहणार? याविषयीचे चित्र अद्यापही स्पष्ट नाही. हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे जातो की शिवसेनेकडे, यावर राष्ट्रवादीची पुढील रणनीती ठरणार आहे. भाजपाकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना तर शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारीचे संकेत मिळत आहेत. वाईचे आमदार मकरंद पाटील, कºहाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढील सप्ताहात या बैठकीचे आयोजन करण्याचे नियोजित केले आहे; पण याचं निश्चित नियोजन प्रतिस्पर्धी उमेदवार ठरल्यानंतरच होणार आहे.
भाजपाच्या भावी आमदारांची रंगीत तालीम असल्याचे मानले जात आहे. त्यादृष्टीने भाजपेचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेते आमदारकीसाठी गेल्या वर्षभरापासून कामाला लागले आहेत. ते प्रतिस्पर्धी पक्षाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ जर भारतीय जनता पार्टीकडे गेला तर येथे राष्ट्रवादीला जास्तीची ताकद लावावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी काम करून तालुका पातळीवर शड्डू ठोकून असलेल्या भावी आमदारांची या निमित्ताने रंगीत तालीम होणार आहे. तशीच ही लढत रंगणार आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याशी बोलून पुढील सप्ताहात पदाधिकारी व नेत्यांची उपलब्धता तपासून आम्ही तालुक्यातील बैठकांचे आयोजन करणार आहोत. मी परगावी असल्याने याविषयी लवकरच कार्यकर्त्यांनाही माहिती देणार आहे.
- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार