कास भूमिपुत्रांसाठी आंदोलन करणार
By admin | Published: June 22, 2017 01:03 AM2017-06-22T01:03:19+5:302017-06-22T01:03:19+5:30
शिवेंद्रसिंहराजे : पाचगणीत कारवाई का नाही?
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘सातारा-कास रस्त्यावरील स्थानिक भूमिपुत्रांनी स्वत:च्या वाडवडिलोपार्जित जागेवर छोटे-मोठे हॉटेल, व्यवसाय करून उपजीविकेचा मार्ग शोधला आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल,’ अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
ते म्हणाले, ‘पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सातारा ते कास रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाची शोधमोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेनंतर स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरण्याचे काम महसूल खात्यातील काही कर्मचारी करीत आहेत. मात्र, हेच कर्मचारी बड्या धेंडांच्या समर्थकांच्याबाबत मूग गिळून गप्प आहेत. अशांच्या पाठीशी आम्ही कदापिही नाही. ज्या भूमिपुत्रांनी स्थानिक पातळीवर वित्तसंस्थेचे कर्ज घेऊन उद्योगाची उभारणी केली आहे. त्यामुळे पर्यटकांची सोय झाली आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे येथील स्थानिकांनी अनेक सुविधा देण्यासाठी स्वत:च्या जमिनी विकल्या आहेत. दागिने गहाण ठेवले आहेत. तसेच बँकांचे कर्ज काढले आहे. अशांवर कारवाई झाल्यास त्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणाने सातारकर उभे राहतील.
या परिसरात बेकायदेशीररीत्या वीजजोडणी, पाणी नळजोडणी ज्यांनी केली आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कारवाई करून दाखवावी. आम्ही जी भूमिका घेतली ती फक्त स्थानिक भूमिपुत्रांसाठीच आहे. या ठिकाणी उद्योग व्यवसाय नसल्यामुळे पुणे, मुंबई शहरात स्थलांतरीत व्हावे लागले आहे. आता उद्योग व्यवसायाची उभारणी करताना कायदा व नियमाची आठवण करून दिली जाते. पण पाचगणी, लोणावळा, उल्हासनगर या परिसरात अशाच पद्धतीने केलेल्या अतिक्रमणाबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. उलट वनखात्याच्या जमिनीवर इमारती उभ्या करणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करून संरक्षण दिले जाते. त्याच धर्तीवर ज्यांचे अतिक्रमण असेल अशाच स्थानिकांबाबत दंडात्मक कारवाई केल्यास आम्ही विरोध करणार नाही. मात्र, याचा गैरअर्थ घेऊन जिल्हा प्रशासन जर धनदांडग्यांना पाठीशी घालत असेल तर खपवून घेणार नाही, असाही इशारा दिला आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, सातारा सभापती मिलिंद कदम, स्थानिक भूमिपुत्र विजय माने, सोमनाथ जाधव, शंकरराव जांभळे, नीलेश जाधव, लक्ष्मण गोगावले, केशव जगताप, संतोष माने, संतोष आटाळे, राम पवार, संपत जाधव, श्रीपती गोगावले आदी उपस्थित होते.
भाजपही भूमिपुत्रांसोबत
कास परिसरातील बांधकामांवर निर्बंध घालून कारवाई सुरू केल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. याबाबत भारतीय जनता पक्ष या लोकांसोबत ठामपणे उभा राहिला आहे. या प्रश्नावर मतभेद अथवा पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आम्ही लढणार आहोत, अशी माहिती भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे यांनी जिल्हाधिकाऱ्यां-सोबत झालेल्या चर्चेवेळी दिली.