कामगारांच्या वेतनासाठी आंदोलन हनुमंत ताटे : अधिकार्यांच्या नियोजनाअभावी एसटी तोट्यात
By admin | Published: May 19, 2014 12:14 AM2014-05-19T00:14:53+5:302014-05-19T00:15:26+5:30
सातारा : ‘एप्रिल-मे महिन्यांत शाळा-महाविद्यालयांना सुटी असते, लग्नसराई यामुळे हा कालावधी एसटी महामंडळासाठी उत्पन्नाचा हंगाम समजला जातो
सातारा : ‘एप्रिल-मे महिन्यांत शाळा-महाविद्यालयांना सुटी असते, लग्नसराई यामुळे हा कालावधी एसटी महामंडळासाठी उत्पन्नाचा हंगाम समजला जातो. मात्र, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच नियोजन न केल्याने तो तोट्यात आहे, असा आरोप करत असतानाच कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी २७ मे रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा एसटी कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिला आहे. एसटी कामगार संघटनेच्या सातारा विभागातील सदस्यांच्या बैठकीसाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस सातारा येथे आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विभागीय सचिव शिवाजीराव देशमुख, ज्ञानेश्वर मोरे, सुनील भिसे, रफिक फरास उपस्थित होते. ताटे म्हणाले, ‘डिझेलच्या दरात वारंवार वाढ होत आहे. टायर, सुट्या भागांच्या किमतीतील वाढ, प्रवासी वाहतुकीतील स्पर्धा, शासनाचे प्रतिकूल धोरण यामुळे एसटी महामंडळ तोट्यात जात आहे. उत्पन्नवाढीसाठी संघटनेने सूचना केल्या होत्या. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करण्याबरोबरच वेळीच योग्य ते नियोजन केले नाही. यामुळे एसटीच्या उत्पन्नावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे कामगारांचे प्रश्न सोडविण्यात मर्यादा येत असून, कामगारांसाठी २०१२ ते २०१६ या कालावधीसाठी वेतन करार होऊन एक वर्ष झाले. तरीही कामगारांना साडेपाचशे कोटींची थकबाकी मिळणे आवश्यक आहे. मात्र, शासनाकडून महामंडळास १८४० कोटी रक्कम देण्यास विलंब होत असल्याचे कारण पुढे करून प्रशासन कामगारांना थकबाकी देण्यास उशीर करत आहे. वाढीव महागाई भत्त्याची रक्कमही वेळेवर मिळत नाही. या स्थितीत कामगार जबाबदार नसतानाही त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी २७ मे रोजी राज्यभर विभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. तसेच विधिमंडळ अधिवेशन काळात ४ जून रोजी आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.’ (प्रतिनिधी)