पुसेगावमध्ये ‘ब्रेक द चेन’साठी गतिमान हालचाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:39 AM2021-04-24T04:39:30+5:302021-04-24T04:39:30+5:30
पुसेगाव : शासनस्तरावर कोरोनाचे वेगाने वाढणारे संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधक निर्बंधांसह लॉकडाऊन सुरूच आहे. मात्र, काही नागरिकांकडून ...
पुसेगाव : शासनस्तरावर कोरोनाचे वेगाने वाढणारे संक्रमण रोखण्यासाठी प्रतिबंधक निर्बंधांसह लॉकडाऊन सुरूच आहे. मात्र, काही नागरिकांकडून या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होताना दिसत नाही, त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी नामी शक्कल लढवत कार्यक्षेत्रातील बऱ्याच गावांत सर्वांना विचारात घेऊन, प्रबोधनात्मक बैठका घेतल्याने जनता कर्फ्यू होऊन गावच्या गावच बंद राहिल्याने नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनावरचा ताण कमी होण्यास मदत होत आहे.
पुसेगाव हे खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठ्या लोकसंख्येचे व मुख्य बाजारपेठेचे गाव आहे. येथील पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुमारे ४२ गावे व वाड्या-वस्त्या यांचा समावेश होतो. बुध, डिस्कळ, राजापूर, नेर, वर्धनगड, विसापूर, कटगुण, खातगुण, निढळ, जाखणगाव, खटाव या गावातील नागरिकांचा कोणत्याही कारणाने पुसेगाव बाजारपेठेत दररोज वावर होत असतो. तसेच या भागातील कोविड केअर सेंटर पुसेगावात प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे. गत आठवड्यात पुसेगाव परिसरात कोरोनाच्या बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. तरीही नागरिक या ना त्या कारणाने विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होते.
शासनाने प्रतिबंधात्मक निर्बंध घालून ठरवून दिलेली दुकाने सुरूच होती. त्यामुळे नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर ये-जा करीत होते. कायद्याने हात बांधल्यामुळे बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही अशा बेफिकीर नागरिकांच्या विरोधात काहीही करता येत नाही, ही गोष्ट लक्षात घेऊन येथील सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी कार्यक्षेत्रात असणाऱ्या मोठ्या गावात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरीय सुरक्षा समिती, महसूल खाते, पोलीस पाटील, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, ग्रामस्थांची संयुक्त बैठक आयोजित करून प्रबोधनात्मक संवाद साधत लोकांनाच सर्वांनुमते जनता कर्फ्यू करण्यास तयार केले.
चौकट..
अनके गावांत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू
काही गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक स्वतः येऊन आमच्या गावात जनता कर्फ्यू करीत असल्याची माहिती पोलिसांना देत आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू होत आहे. पुसेगाव, निढळ, खातगुण, खटाव, बुध या गावांत जनतेनेच आता कोरोना रोखण्यासाठी कर्फ्यू जारी केला आहे, तर पोलीस ठाण्याच्यावतीने सर्वानुमते उर्वरित मोळ, डिस्कळ, नेर, वर्धनगड व इतर गावांत तातडीने अशा बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती चेतन मछले यांनी दिली.
फोटो कॅप्शन : पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी कार्यक्षेत्रातील गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रबोधानात्मक बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.(छाया : केशव जाधव)