सातारा जिल्हा रुग्णालयातील ‘एमआरआय’ मशीन अकोल्याला नेण्याच्या हालचाली, रुग्णांवर येणार आर्थिक संकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:41 IST2025-02-17T15:40:46+5:302025-02-17T15:41:06+5:30
सिटी स्कॅन मशीनही कऱ्हाडला नेले..

सातारा जिल्हा रुग्णालयातील ‘एमआरआय’ मशीन अकोल्याला नेण्याच्या हालचाली, रुग्णांवर येणार आर्थिक संकट
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना संजीवनी ठरणाऱ्या ‘एमआरआय’ मशीनच दुखणं वाढलं असून, हे मशीन आता अकोला येथे नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे मशीन नेल्यानंतर सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये १० ते १५ हजार रुपये एमआरआयसाठी मोजावे लागणार आहेत. त्यामुळे हे मशीन ‘सिव्हिल’मध्येच ठेवावे, असा सूर सातारकरांमधून उमटू लागला आहे.
सातारा जिल्ह्यातून गेलेल्या महामार्गावर तसेच आंतरराज्य मार्गावर अनेक अपघात होत आहेत. या अपघातांत जखमी झालेल्या रुग्णांना रुग्णवाहिकेतून तातडीने सिव्हिलमध्ये आणले जाते. रुग्णावर तातडीने उपचार होण्यासाठी रुग्णाचे एमआरआय केले जाते. जेणेकरून रुग्णाच्या मेंदू व शरीरातील इतर भागावर नेमकी जखम, अंतर्गत रक्तस्त्राव कोठे झाला आहे, हे समजते.
त्यानंतर योग्य उपचार होत असतात. हे मशीन गोरगरीब, सर्वसामान्य रुग्णांसाठी मोठे आधारवड आहे. असे असताना हे मशीन आता अकोला येथे नेण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू झाल्या आहेत. याची कारणेही भन्नाट दिली जात आहेत. म्हणे, जागेअभावी हे मशीन अकोला येथे नेण्यात येत आहे.
वास्तविक, हे एमआरआय मशीन २०२२ मध्ये सिव्हिलमध्ये दाखल झाले. काही दिवस हे मशीन नियमित सुरू राहायचे. मात्र, कधी तज्ज्ञ नाहीत तर कधी मशीन बिघडले आहे, असे सांगून रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जात होता. पूर्वी जशी परिस्थिती होती. तशीच आताही आहे. त्यामुळे मशीन नियमित कधी सुरू झालेच नाही; परंतु एमआरआय मशीन सुरू ठेवण्यासाठी ज्या काही त्रुटी असतील त्या भरून काढून जिल्हा प्रशासनाने हे मशीन कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे असताना काही तरी कारणे सांगून हे मशीन अन्य जिल्ह्यात नेले तर सातारा शहरातीलच नव्हे तर परजिल्ह्यांतील सर्वसामान्य रुग्णांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे हे मशीन कोणत्याही परिस्थितीत ‘सिव्हिल’मध्येच राहावे, यासाठी लोकप्रतिनिधींसह सातारकरांना आता उठाव करण्याची वेळ आली आहे.
सिटी स्कॅन मशीनही कऱ्हाडला नेले..
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश जगदाळे यांच्या काळात असलेले सिटी स्कॅन मशीन अशाच प्रकारे कऱ्हाड येथे नेण्यात आले होते. त्यावेळीसुद्धा सर्वसामान्य रुग्णांची मोठी परवड झाली होती.
‘हे’ मशीन म्हणजे ‘सिव्हिल’चा जीव..
एमआरआय मशीन म्हणजे ‘सिव्हिल’चा अक्षरश: जीव आहे. हा जीवच जर बाहेर काढून नेत असतील तर रुग्ण अर्धमेले होतील. खासगीमध्ये एमआरआय करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. १० ते १५ हजार रुपये यासाठी खर्च येतो. एवढे पैसे सिव्हिलमध्ये येणाऱ्या रुग्णांनी कोठून आणायचे; एकीकडे मोफत उपचार म्हणून दिंडोरा पिटायचा आणि दुसरीकडे रुग्णांना अशा मशीन गायब करून भुर्दंड पाडायचा, असाच काहीसा उद्योग सिव्हिलमध्ये सुरू असल्याचा आरोप सातारकरांमधून केला जातोय.