हृदयद्रावक! आई-वडिलांचा आधार हरपला; सातारच्या २६ वर्षीय जवानाला 'वीरमरण'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:52 PM2023-07-21T12:52:03+5:302023-07-21T12:52:39+5:30
vijay kokare martyred : सातारा जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे.
vijay kokare indian army | सातारा : सातारा जिल्हा हा जवानांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो. आपल्या भारतमातेच्या सेवेसाठी या जिल्ह्याने अनेक शूरवीर सीमेवर पाठवले आहेत. तर अनेकांना देशासाठी लढताना वीरमरण देखील आलं आहे. आता आणखी एक सातारचा जवान तिरंग्याची सेवा करत असताना शहीद झाला आहे. सातारा तालुक्याच्या परळी येथील सांडवली वारसवाडी भागातील जवान विजय रामचंद्र कोकरे यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आलं. २६ वर्षीय जवानाला हुतात्म आल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
सातारा शहरासह सांडवली परिसरात त्यांच्या श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत. मागील चार वर्षे सैन्यदलात कार्यरत असणाऱ्या विजय यांची प्राणज्योत मालवली अन् एकच शोककळा पसरली. राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वीर जवानास श्रद्धांजली वाहिली.
२६ वर्षीय जवानाला 'वीरमरण'
जवान विजय कोकरे हे शहीद झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना आर्मी सेंटरकडून देण्यात आली. पण, पार्थिव मूळ गावी कधीपर्यंत आणले जाईल याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. खरं तर विजय कोकरे यांचे शिक्षण मुंबईत झाले असून त्यांचे आई-वडील देखील मुंबईत राहतात. वाहनचालकाच्या मुलाचे लहानपणापासून स्वप्न होते की, भविष्यात सैन्यदलात भर्ती होऊन देशाची सेवा करावी. विजय यांच्या पश्चात आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे.
सैनिकी परंपरा असलेल्या आपल्या सातारा जिल्ह्यातील परळी भागातील सांडवली वारसवाडी येथील जवान विजय कोकरे हे जम्मू काश्मीर या ठिकाणी देशसेवेत कार्यरत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शालेय जीवनापासून देशसेवेत जाण्याची त्यांची जिद्द होती pic.twitter.com/aEQ9BBNhSF
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) July 21, 2023
उदयनराजेंनी वाहिली श्रद्धांजली
खासदार उदयनराजे भोसले यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून वीर जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले, "सैनिकी परंपरा असलेल्या आपल्या सातारा जिल्ह्यातील परळी भागातील सांडवली वारसवाडी येथील जवान विजय कोकरे हे जम्मू काश्मीर या ठिकाणी देशसेवेत कार्यरत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. शालेय जीवनापासून देशसेवेत जाण्याची त्यांची जिद्द होती. २०१७ मध्ये मोठ्या कष्टाने ते स्वप्न विजय यांनी पूर्ण केले. जवान विजय यांच्यावर अतिशय लहान वयात (२६) झालेला हा आघात सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली."