खासदार दिल्लीतून थेट साताऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:39 AM2021-07-27T04:39:52+5:302021-07-27T04:39:52+5:30
कऱ्हाड : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली येथे गेलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून सातारा गाठले. अतिवृष्टीमुळे ...
कऱ्हाड : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्ली येथे गेलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी शनिवारी पहाटेचे विमान पकडून सातारा गाठले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांनी महाबळेश्वर, वाई, कऱ्हाड तालुक्यांमधील बाधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठी हानी झाली आहे. काही ठिकाणी दरडी कोसळल्याने अनेकजण दगावले आहेत. शेतीसह रस्ते, पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. या ओढवलेल्या परिस्थितीचे गंभीर स्वरूप पाहता खासदार श्रीनिवास पाटील हे दिल्लीहून थेट साताऱ्यात आले. सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, खासदार पाटील हे दिल्ली येथे अधिवेशनाला उपस्थित राहिले होते. तेथून मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील परिस्थिती पाहून ते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क ठेवून परिस्थितीचा आढावा घेत होते. मात्र, नागरिकांवर ओढवलेल्या बिकट प्रसंगामुळे त्यांनी शनिवार, दि. २४ रोजी पहाटेचे विमान पकडून पुणेमार्गे सातारा गाठले. साताऱ्यात आल्यानंतर महाबळेश्वर, वाई, कऱ्हाड तालुक्यांमधील बाधित गावांना भेट दिली.
महाबळेश्वर येथे आमदार मकरंद पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहात तालुक्यातील जीवितहानी व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाचा त्यांनी आढावा घेतला. महाबळेश्वर तालुक्यातील बरेच रस्ते व पूल वाहून गेल्याने अनेक गावे संपर्कहीन झाली आहेत. हे रस्ते दुरुस्त करावेत, गावांशी लवकर संपर्क साधावा, लोकांपर्यंत पोहोचावे. वीज पुरवठा तातडीने सुरळीत करावा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, रेशनिंग व्यवस्था सुरळीत करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार सुषमा चौधरी, बाळासाहेब भिलारे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, राजूशेठ राजापुरे, प्रवीण भिलारे, किसन शिंदे, गटविकास अधिकारी घोलप आदी उपस्थित होते.
वाई तालुक्यातील कोंढावळे-देवरुखवाडी, मेणवली, आभेपुरी, जांभळी व कऱ्हाड तालुक्यातील पाली येथे भेट देऊन खासदार पाटील यांनी नुकसान झालेल्या परिसराची पाहणी केली. तसेच संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचे आश्वासन देऊन पिकांचे व घराच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासनाकडून मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासन दिले.
फोटो : २६ केआरडी ०१
कॅप्शन : वाई तालुक्यातील नुकसानाची खासदार श्रीनिवास पाटील यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.