खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून कोट्यवधीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 01:38 PM2022-03-02T13:38:58+5:302022-03-02T13:39:46+5:30
फलटण : ‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची ...
फलटण : ‘खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज साखर कारखाना व स्वराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून आपली कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे,’ असा गंभीर आरोप दिगंबर आगवणे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
दिगंबर आगवणे यांनी अर्जात म्हटले आहे की, व्यवसायाच्या माध्यमातून २००७ मध्ये रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या सुरवडी येथील तत्कालीन स्वराज दूध डेअरीसाठी लाकूड पुरवठा करीत होतो. तेव्हापासून आर्थिक व्यवहार होते. त्यानंतर रणजितसिंह यांनी त्यांच्या उपळवे येथील स्वराज कारखान्याचे व्हाईस चेअरमनपदाचे आमिष दाखवून आर्थिक मदतीची विनंती केली.
आपण २०१४ मध्ये पिंपळवाडी येथील सर्व्हे नं. ६४/४, क्षेत्र १.६२ हेक्टर ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुणे कॅम्प शाखाकडून ५० कोटी, बँक ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतून ४७.१३ कोटी आणि कॅनरा बँककडून ४५ कोटी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या साखर कारखान्यास कर्ज मिळण्याकरिता गहाण ठेवली. ऑक्टोबर २०१४ मध्ये नमूद कारखान्याचे व्हाईस चेअरमनपदावर आपली नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले.
डिस्टिलरी प्रोजेक्टसाठी पुन्हा ही जमीन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुणे कॅम्प शाखेत गहाण ठेवून ८४ कोटी कर्ज असे २२६ कोटी रुपये कर्ज साखर कारखान्याच्या चेअरमन रणजितसिंह निंबाळकर आणि संचालक मंडळाने तिन्ही बँकेच्या संमतीने काढले आहे.
रणजितसिंह हे चेअरमन असलेल्या स्वराज पतसंस्थेतून २०१३ मध्ये त्यांच्या पत्नी जिजामाला यांना पंचायत समितीची निवडणूक लढवायची असल्याने आपल्या नावे कर्ज घेतले. पुढे २०१६-२०१७ मध्ये त्यांनी याच पतसंस्थेमध्ये आपली सुरवडी येथील शेत सर्व्हे नं. ४८/२ ह्या जमिनीचा वाद सुरू असल्यामुळे त्यांच्यावर वहिवाट व बोजा दिसण्यासाठी केस चालू असताना रणजितसिंह यांनी ही जमीन गहाण ठेवून एक कोटी रुपये कर्ज घेतले होते.
परंतु कर्ज प्रकरणात आपल्या सह्या घेऊन संबंधित रक्कम आपल्याला मिळालेली नाही. त्यांपैकी परस्पर ५९ लाख रुपये कर्ज पतसंस्थेमध्ये कारखान्याने भरल्याचे आपल्याला समजले आहे. या कर्ज प्रकरणात आपल्या सह्या असल्याने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी या पतसंस्थेद्वारे कलम १३८ एन. आय. ॲक्टप्रमाणे न्यायालयात दावा दाखला केला आहे, असे दिगंबर आगवणे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणांवरून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज इंडिया ॲग्रो लिमिटेड या साखर कारखान्याचे सर्व संचालक आणि स्वराज नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक यांच्याविरोधात विश्वासघात, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिसांकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.