सातारा जिल्ह्यात सैन्य भरती केंद्र सुरू करावे, खासदार उदयनराजेंनी केली संरक्षण मंत्र्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 04:47 PM2021-12-18T16:47:07+5:302021-12-18T16:48:39+5:30
मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहर आणि जिल्ह्याला अव्दितीय अशी सैनिक परंपरा
सातारा : सैनिक परंपरा लाभलेल्या साताऱ्याच्या भूमीत लष्कर-सैन्य भरती केंद्र उभारावे तसेच आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मिलिटरी हॉस्पिटल किंवा कमांड हॉस्पिटलच्या अखत्यारितील वैद्यकीय उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा शहर आणि जिल्ह्याला अव्दितीय अशी सैनिक परंपरा लाभली आहे. मिलिटरी अपशिंगेसारख्या गावांमधील घरटी किमान एक व्यक्ती ब्रिटिश आमदनीपासून सैनिकसेवा आणि देशसेवा बजावत आहे. जिल्ह्यातील माजी सैनिकांची संख्यादेखील सर्वाधिक दखलपात्र आहे. त्यामुळे साताऱ्यात सैन्य भरती केंद्र असायला हवे, अशी तमाम तरुण व नागरिकांची इच्छा आहे.
सध्या नागपूर, औरंगाबाद, पुणे, मुंबई, अहमदाबाद, जामनगर या ठिकाणी सैन्य भरती केंद्र आहे. सातारा जिल्ह्यातील तरुणांना पुणे, औरंगाबाद, मुंबई येथे भरतीसाठी जावे लागते. त्यामुळे सैन्य भरती केंद्र सातारा येथे सुरू करण्यात यावे, अशी मागणी मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे केली आहे. आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांकरिता सैन्य हॉस्पिटल उभारणे अत्यंत गरजेचे आहे. किमान कमांड हॉस्पिटलचे उपकेंद्र सातारा येथे तातडीने सुरू करण्याबाबत सूचना जारी कराव्यात, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.
दरम्यान, मंत्री राजनाथसिंह यांनी सातारा जिल्ह्यासह विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच सैन्य भरती केंद्र आणि आर्मी हॉस्पिटलबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत आश्वस्त केल्याचे खा. उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.