उदयनराजेंचा चौकार; राष्ट्रवादीनंतर भाजपकडूनही गुलाल, सातारा लोकसभा मतदारसंघात 'या' दिग्गजांनी केले नेतृत्व 

By नितीन काळेल | Published: June 5, 2024 07:10 PM2024-06-05T19:10:22+5:302024-06-05T19:12:07+5:30

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी चारवेळा नेतृत्व केले

MP Udayanraje Bhosale will lead the Satara Lok Sabha constituency for the fourth time | उदयनराजेंचा चौकार; राष्ट्रवादीनंतर भाजपकडूनही गुलाल, सातारा लोकसभा मतदारसंघात 'या' दिग्गजांनी केले नेतृत्व 

उदयनराजेंचा चौकार; राष्ट्रवादीनंतर भाजपकडूनही गुलाल, सातारा लोकसभा मतदारसंघात 'या' दिग्गजांनी केले नेतृत्व 

सातारा : सातारा लाेकसभा मतदारसंघाच्या आतापर्यंत १८ सार्वत्रिक निवडणुका झाल्या असून महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी चारवेळा नेतृत्व केले. आता या पंक्तीत खासदार उदयनराजे भोसले हेही आले आहेत. राष्ट्रवादी सोडल्यानंतरही त्यांनी भाजपकडून विजय मिळवला आहे. तर ज्येष्ठ नेते दिवंगत प्रतापराव भोसले यांनी हॅट्ट्रिक साधली होती. तर लक्ष्मणराव पाटील यांनी दोनवेळा तर इतर पाचजणांनी एकदा सातारा लोकसभेचे नेतृत्व केले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे आतापर्यंत दिग्गजांनी नेतृत्व केले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर, क्रांतिसिंह नाना पाटील आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर इतर दिग्गजांनीही सातारा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून आपला ठसा उमटवला आहे. या मतदारसंघावर अधिक करून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा क्रमांक लागतो. तर शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टीनेही एकदा विजय मिळविलेला आहे. तर आताच्या २०२४ च्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात प्रथमच कमळ फुलले आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ ला प्रथम लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. यामध्ये लोकसभेच्या सातारा उत्तर मतदारसंघातून गणेश अळतेकर यांनी विजय मिळविला होता. पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले. मात्र, दुसऱ्या १९५७ च्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मतदारसंघावर झेंडा फडकवला. काँग्रेसचे उमेदवार अळतेकर यांना दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. असे असले तरी १९६२ च्या तिसऱ्या निवडणुकीत क्रांतिसिंह नाना पाटील यांना साताऱ्यावर कब्जा करता आला नाही. देशभक्त किसन वीर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यामुळे मतदारसंघात पुन्हा काँग्रेसचा झेंडा रोवला गेला.

१९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यशवंतराव चव्हाण प्रथमच सातारा मतदारसंघात उभे राहिले आणि विजयीही झाले. यानंतर १९८० पर्यंतच्या इतर तीन निवडणुकांतही यशवंतराव चव्हाण विजयी झाले. चव्हाण यांनी देशाचे अर्थ, संरक्षण, परराष्ट्रमंत्री ते उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली. तसेच सातारा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला केला. १९८४ मध्ये चव्हाण यांचे निधन झाले. त्यानंतर १९८४ च्या डिसेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत प्रतापराव भोसले हे काँग्रेसकडून रिंगणात उतरले आणि विजयही मिळवला. त्यानंतर १९८९ आणि १९९१ च्या निवडणुकीतही भोसले काँग्रेसकडून विजयी झाले.

मात्र, याच काळात महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. अशा काळातच १९९६ ला लोकसभा निवडणूक झाली. यामध्ये हिंदुराव नाईक-निंबाळकर विजयी झाले आणि मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकला. या निवडणुकीत प्रतापराव भोसले यांचा पराभव झाला. त्यानंतर भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढविली नाही. मात्र, १९९८ ला काँग्रेसकडून अभयसिंहराजे भोसले निवडणुकीत उतरले आणि विजयही मिळविला.
१९९९ ला शरद पवार हे राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील निवडून आले, तर शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर दुसऱ्या तर राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दादाराजे खर्डेकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

२००४ च्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील यांनी दुसऱ्यावेळी विजय मिळविला. यावेळी शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा अवघ्या चार हजार मतांनी पराभव झाला. २००९ पासून २०१९ पर्यंतच्या तीन निवडणुका या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीकडून जिंकल्या. तसेच हॅट्ट्रिकही साधली. मात्र, २०१९ च्या निवडणुकीनंतर चारच महिन्यांत उदयनराजेंनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीने कब्जा केला. श्रीनिवास पाटील खासदार झाले. २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक ही १८ वी ठरली. या निवडणुकीत भाजपकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे रिंगणात होते. उदयनराजे विजयी झाल्याने त्यांनी चाैकार ठोकला आहे. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबरीने साताऱ्याचा खासदार होण्याचा विक्रमही केला आहे.

काँग्रेस १० तर राष्ट्रवादी ५ वेळा विजयी..

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत १८ वेळा सार्वत्रिक तर एकदा पोटनिवडणूक झाली आहे. आताच्या २०२४ च्या निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागला. यामध्ये भाजपच्या उदयनराजेंनी बाजी मारली. तर आतापर्यंतच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १० वेळा सातारा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. तर राष्ट्रवादीने पाचवेळा विजय मिळवलाय. तसेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेनेने एकदा सातारा मतदारसंघात झेंडा फडकवला आहे. गेल्या २० वर्षांत सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला. आताच्या या निवडणुकीत हा बालेकिल्ला ढासळला आहे. भाजपचे कमळ प्रथमच फुलले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा उभारी घेण्यासाठी ताकद लावावी लागणार आहे.

Web Title: MP Udayanraje Bhosale will lead the Satara Lok Sabha constituency for the fourth time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.