‘एमपीएससी’च्या अभ्यासाचे काउंटडाउन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:53+5:302021-03-13T05:12:53+5:30

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा ‘यथावकाश’ नव्हे तर तातडीने २१ मार्चला होणार असल्याच्या ...

MPSC study countdown begins | ‘एमपीएससी’च्या अभ्यासाचे काउंटडाउन सुरू

‘एमपीएससी’च्या अभ्यासाचे काउंटडाउन सुरू

Next

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा ‘यथावकाश’ नव्हे तर तातडीने २१ मार्चला होणार असल्याच्या सरकारच्या घोषणेने परीक्षार्थींना दिलासा मिळाला आहे. पुन्हा एकदा नव्या जोमाने अभ्यासात व्यग्र राहण्यात मुलांनी पसंती दर्शविली आहे. एक सप्ताहाचा वाढीव वेळ मिळाला, अशी भावना मनात ठेवून अभ्यास पूर्ण करण्याचं काउंटडाउन सुरू झालं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आली आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी’, असे आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. विविध कारणांनी जवळपास चौथ्यांदा ही परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी हादरून गेले होते. शुक्रवारी सकाळी आयोगाने परीक्षेची तारीख २१ जाहीर केल्यानंतर परीक्षार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.

स्पर्धा परीक्षा देतानाची मानसिकता सांभाळणे अशक्य होत असताना कित्येकाचे आयुष्य पुन्हा एकदा ‘यथावकाश’ धोक्यात घातल्याबद्दल लोकसेवा आयोगाचे आभार. कोविड व्यवस्थापन आणि कोविड लॉकडाउन या गोष्टींच्या खेळखंडोबात विद्यार्थ्यांचे आयुष्य देशोधडीला लागत आहे, याचा तरी विचार करा, असे संतप्त मेसेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले. पुण्यात राज्यभरातील परीक्षार्थींनी रस्त्यावर उतरून उद्रेक केल्यानंतर हा शासनाने निर्णय मागे घेतला. परिणामी, विद्यार्थी पुन्हा एकदा ताण सोडून अभ्यासाला लागले आहेत.

चौकट :

निर्णय फिरवला, ताणाचं काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने गुरुवारी परीक्षा रद्द केल्याचं जाहीर करण्यात आलं. या निर्णयाला चोवीस तासही होत नाहीत, तोवर आयोगाने निर्णयात बदल करून परीक्षा एक आठवडा पुढं गेल्याचं जाहीरही करून टाकलं. परीक्षा नाही होणार ते होणार, या चोवीस तासांमध्ये मुलांचे मानसिक खच्चीकरण झाले. आयोगाच्या निर्णयाने काहींना रक्तदाबाचाही त्रास जाणवला. अनेकांमध्ये हतबलता, नैराश्याची भावनाही निर्माण झाली. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मानसिक स्वास्थ्यही खूपच महत्त्वाचे ठरते.

कोट :

आयोगाने परीक्षेची पुढची तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली. यासाठी अनेक ज्ञात आणि अज्ञातांनी सहाय्य केलं. माध्यमांनी ज्या पद्धतीने याचे वार्तांकन केले, त्यामुळे आयोगाला निर्णय बदलावा लागला. परीक्षेला बसता येईल, याचं कौतुक आहे.

- प्रवीण क्षीरसागर, गजवडी, ता. सातारा.

स्पर्धा परीक्षेसाठी अनेकांनी आपलं कुटुंब पणाला लावलंय. या परीक्षांसाठी अभ्यास करण्याबरोबरच परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणंही महत्त्वाचं आहे. कोरोना काळात परीक्षा रद्द झाल्यानंतर नव्या उमेदीने आम्ही तयारीला लागलो आणि परीक्षा ‘यथावकाश’ घेऊ म्हटल्यावर धक्का बसला. नवीन तारीख जाहीर झाल्याने दिलासा मिळालाय. आता अभ्यासावर लक्ष केंद्रित केलंय.

- प्रदीप वाघमळे, कण्हेर.

आठ दिवस बोनस!

आयोगाने परीक्षेची यथावकाश तारीख कळवू म्हटल्यावर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. संध्याकाळपर्यंत शासन स्तरावर हालचाली होऊन या परीक्षा याच महिन्यात होतील, असे संकेत मिळाले. त्यामुळे अनेक परीक्षार्थींनी परीक्षेच्या तयारीसाठी आणखी आठ दिवसांचा जादा अवधी मिळाल्याचं स्वागत करून अभ्यासाला नेटाने सुरुवात केल्याचे चित्रही पहायला मिळाले.

Web Title: MPSC study countdown begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.