Satara: वाईतील तरुण लघुकाव्यातून उलगडतोय ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचा इतिहास!
By सचिन काकडे | Published: April 8, 2024 03:14 PM2024-04-08T15:14:27+5:302024-04-08T15:14:59+5:30
या अनोखा उपक्रमामुळे शस्त्रांचा इतिहास घराघरात पोहोचू लागला
सचिन काकडे
सातारा : तलवार, दांडपट्टा, वाघनघं, भाला, कट्यार अशा शस्त्रांनी लढाईत मोलाची भूमिका बजावली आहे. या ऐतिहासिक शस्त्रांचा वापर कालौघात बंद झाला असला तरी त्यांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. वाई येथे राहणाऱ्या मृण्मय दीपक अरबुणे (वय २६) या तरुणाने याच शस्त्रांचा इतिहास लघुकाव्य रूपात मांडण्याचा छंद लीलया जोपासला असून, त्याच्या या अनोखा उपक्रमामुळे शस्त्रांचा इतिहास घराघरात पोहोचू लागला आहे.
भारतीय इतिहास अभ्यास क्षेत्रात शस्त्रास्त्रांचा स्वतंत्र पद्धतीने अभ्यास करण्याची कोणतीही शाखा उपलब्ध नाही. त्याचमुळे मृण्मयला शस्त्रांचा अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या. परंतु, या अडचणींवर मात करून त्याने शस्त्रांसंबंधी संदर्भ साहित्य मिळवून अभ्यास करण्यास सुरुवात केली. कोरोनो संक्रमण काळात मृण्मयला कोरोनाची लागन झाली. पुणे येथील एका रुग्णालयात तो उपचार घेत होता. या मोकळ्या वेळेत त्याने शस्त्रांचा इतिहास लघुकाव्यातून मांडण्याचा प्रयत्न सुरू केला.
शस्त्र आणि त्याची काव्यात्मक माहिती त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टला उत्तम प्रतिसाद मिळू लागल्याने त्याने आपली काव्यरचना रचना पुढे सुरू ठेवली. गेली अडीच-तीन वर्षांत मृण्ययने ५०० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रांचा काव्यरूपातून उलगडा केला आहे.
‘चंद्रहास’ नावाने काव्यरचना
मृण्यम याने इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून, सध्या तो पुणे विद्यापीठातून इतिहास विषयात पीएचडीचे शिक्षण घेत आहे. शस्त्रास्त्रांवर लिखाण करत असताना त्या लिखाणाला सजेसं टोपण नाव असावं, अशी मृण्मयची इच्छा होती. त्यासाठी त्याने ‘चंद्रहास’ हे टोपण नाव निवडले. हे नाव निवडण्यामागे कारण असे की, शिवशंकराने रावणाला दिलेल्या तलवारीचे नाव चंद्रहास होते. ही तलवार शिवाशी निगडित आहे. तसेच, ते तलवारीचे नाव आहे आणि मृण्मय शस्त्रास्त्रांवर लिखाण करतो म्हणून त्याने ‘चंद्रहास’ या नावाने काव्यरचना सुरू केल्या.
शस्त्रास्त्र या विषयावर सखोल संशोधन करून भारतीय इतिहासाच्या अभ्यास शाखांमध्ये शस्त्रास्त्रांचा अभ्यास करणारी शस्त्रास्त्र शास्त्र अशी एक अभ्यास शाखा निर्माण करण्याचा माझा मानस आहे. सध्या याच अनुषंगाने प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रांवर माझी पीएचडी सुरू आहे. भविष्यात याच क्षेत्रामध्ये संशोधनात्मक कार्य करण्याची इच्छा आहे. ऐतिहासिक माहितीसाठी सतत नवनवीन ऐतिहासिक संदर्भ जमवतो; वाचतो त्याचबरोबर अलंकारिक लिखाण करण्यासाठी आणि शब्द सामर्थ्यासाठी कादंबऱ्या, काव्यसंग्रहदेखील वाचतो. - मृण्मय अरबुणे