महावितरणच्या दरवाढीचा वीज ग्राहकांना झटका : वीज वापराच्या दुप्पट बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:56 PM2018-12-12T23:56:22+5:302018-12-12T23:56:49+5:30
मलकापूर : सध्या वीज वापर ही घराघरातील आवश्यक गरज बनली आहे. एका बाजूला गरज तर दुसऱ्या बाजूला विजेच्या वाढत्या बिलामुळे ही गरजच आज सर्वसामान्यांची डोकेदुखी बनली आहे.
मलकापूर : सध्या वीज वापर ही घराघरातील आवश्यक गरज बनली आहे. एका बाजूला गरज तर दुसऱ्या बाजूला विजेच्या वाढत्या बिलामुळे ही गरजच आज सर्वसामान्यांची डोकेदुखी बनली आहे. प्रती युनिट वीजदराने होणाºया वापराचे बिल एकपट व वाढलेल्या स्थिर आकारासह इतर आकाराच्या वाढीव टक्केवारीमुळे तेच बिल दुप्पट होत आहे. त्यामुळे वीज वापर एकपट तर बिल दुप्पट झाल्याने ग्राहकांना महावितरणचा चांगलाच झटका बसत आहे.
महावितरणने गेल्या काही महिन्यांपासून स्थिर आकारात सातत्याने वाढ केली आहे. घरगुती वापराच्या मीटरसाठी मार्च २०१७ मध्ये स्थिर आकार ५५.०० एवढा होता. तोच दोन-चार रुपयांनी वाढत वर्षअखेरीस ६० रुपयांवर पोहोचला. एप्रिल व मे महिन्यात टप्प्याटप्प्याने वाढ होऊन ६५ रुपये आकारणी झाली. यापुढे झपाट्याने वाढ होत आॅक्टोबर २०१८ मध्ये १५ रुपयांची वाढ करून स्थिर आकार ८० रुपयांवर पोहोचला आहे. प्रत्येक महिन्यात आलेल्या बिलातील देयकांचे बारकाईने वाचन केल्यास नवनवीन इतर आकाराचा सातत्याने चढता आलेख ठेवला असल्याचेच दिसून येत आहे.
यापूर्वी एका नवीन आकाराची भर टाकली होती. त्या नवीन आकाराचे नाव वहन आकार आहे. तो १.१८ रुपये पर युनिट असा आकारला जातो. म्हणजेच प्रतीयुनिट वीज दरातच अप्रत्यक्षरीत्या वाढ होते. ३ रुपयांचा दर ४.१८ वर जातो. अशाच पद्धतीने दराच्या प्रत्येक स्लॅबमध्ये भरमसाठ वाढ होत आहे. त्यातच वीज आकार, वीज शुल्क व इतर आकार अशा नवनवीन आकारांची वाढती टक्केवारी दिवसेंदिवस वीज ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रकार घडत आहे. त्या वेगवेगळ्या आकारांमुळे मागील बिलाच्या एकूण ४० ते ५० टक्क्यांनी वीजबिलात वाढ झालेली आहे. त्यामुळे पूर्वी चारशे ते साडेचारशे येणारे बिल या वाढीव आकारांमुळे तेच बिल आज आठशे ते नऊशे रुपये येत आहे.
वीज वापर तेवढाच होत असताना बिल मात्र दुप्पट होत आहे. महावितरण कंपनी प्रत्येक महिन्यात कोणता ना कोणता आकार वाढवून अक्षरश: सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे चित्र आहे. तर याउलट शासकीय कर्मचारी व बडीबडी मंडळीसारखे बहुतांशी ग्राहक या दरवाढीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. अशा पद्धतीने अचानक केलेली वीजबिल वाढ सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र दरवाढीच्या जात्यात भरडला जात आहे. या विरोधात आवाज उठवला नाही तर ठराविक अंतराने नवनवीन आकारात भरच पडणार आहे. तरी या वाढत्या बिलांविरोधात सामाजिक संघटनांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.
वीज बिलात दराबाबत भिन्नता
महाराष्ट्रात ० ते १०० युनिटसाठी ३ रुपये, १०१ ते ३०० युनिट ६.७३ रुपये, ३०१ ते ५०० युनिट ९.७५ रुपये वीजदर आहेत. तर तेच दिल्लीमध्ये ० ते २०० युनिटसाठी २ रुपये व २०० युनिटच्या वर २.९७५ ते ३ रुपये एवढा दर आहे. याशिवाय ४०० युनिटपर्यंत जे काही बिल येते त्यात ५० टक्के माफ केले जाते. या फरकामुळे महाराष्ट्रात ४०० युनिट बिलासाठी २ हजार ९०० रुपये भरावे लागतात. तर दिल्लीवाले तेवढ्याच युनिटसाठी १ हजार १०० रुपये भरतात. ही एकाच देशातील दोन राज्यांत वीजदरात तफावत आहे.
स्थिर आकाराचा
चढता आलेख
मार्च २०१७ - ५५ "
एप्रिल २०१७ - ५९ "
मे २०१७ - ६० "
एप्रिल २०१८ - ६२ "
मे २०१८ - ६५ "
आॅक्टोबर २०१८ - ८० "