वीज जोडणी तोडल्यास महावितरणची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:36 AM2021-03-25T04:36:55+5:302021-03-25T04:36:55+5:30
कोपर्डे हवेली : महावितरण कंपनीने कृषिपंपांची आणि घरगुती विजेची जोडणी तोडू नये अन्यथा होणाऱ्या परिणामाला महावितरण कंपनी जबाबदार राहील, ...
कोपर्डे हवेली : महावितरण कंपनीने कृषिपंपांची आणि घरगुती विजेची जोडणी तोडू नये अन्यथा होणाऱ्या परिणामाला महावितरण कंपनी जबाबदार राहील, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे आणि शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे महावितरणला दिला आहे. कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, रयत क्रांतीचे कऱ्हाड तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, शामगावचे प्रल्हाद पाटील, युवराज पोळ, पार्लेचे सुभाष नलवडे, टेंभूचे नागराज शिंदे, आदी शेतकरी उपस्थित होते.
रयत क्रांती संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, कृषिपंपाची वीज जोडणी तोडणे, ट्रान्सफाॅर्मर बंद करुन वीजबिलाच्या वसुलीचा तगादा लावला जात आहे. शेतकरी लाॅकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बिले भरण्यास सक्षम नाही.
सध्या जिल्ह्यामध्ये एकाही साखर कारखान्याने ऊसाची एफआरपी शेतकऱ्यांना दिलेली नाही. सरकार आणि सरकारमधील मंत्री यावर कोणतेही कारवाई करत नाहीत. परंतु, शेतकऱ्यांची वीजबिले थकली म्हणून वीज जोडणी तोडली जात आहे. शासनाने अगोदर साखर कारखान्यांवर कारवाई करावी आणि मगच विजेच्या बिलाची वसुली करावी. वीज जोडणी तोडली तर होणाऱ्या परिणामाला शासन आणि महावितरण कंपनी जबाबदार राहील.
सध्या उन्हाळा असल्याने शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडू नये अन्यथा रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सरकार व महावितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन येणाऱ्या काळात केले जाईल व त्याची सर्व जबाबदारी सरकार आणि महावितरणची असेल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले असून, त्यावर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
फोटो ओळ - ओगलेवाडी येथे कार्यकारी अभियंता यांना सचिन नलवडे, सुदाम चव्हाण, शिवाजी पाटील व शेतकऱ्यांनी निवेदन दिले.