म्युकर मायकोसिस परतीच्या मार्गाला;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:38+5:302021-06-16T04:49:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्याला कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासले आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्याला कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासले आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२२ रुग्ण आढळले असून, १९ जणांचा बळीही गेला आहे, तर ३७ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. मात्र, पाच जणांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे. या आजाराची दाहकता वाढू लागली असल्याने जिल्हा पातळीवर लगेचच उपाययोजनांची सुरुवात केली.
जिल्हा रुग्णालयात या आजारासाठी दोन स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. त्यात एका वॉर्डमध्ये १७ बेड, तर दुसऱ्या वॉर्डमध्ये १० बेड तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर जम्बो कोविड सेंटरमध्ये ४० बेडचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात तपासणी कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्ह्यातील १३ खासगी रुग्णालयांत या आजारावरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुरशीचा धोका शरीरात अचानक कुठे उद्भवेल आणि त्यानुसार कोणत्या तज्ज्ञ वैद्यकीय तज्ज्ञाची गरज पडेल सांगता येत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात सर्व विशेषज्ञ डॉक्टरांना या वॉर्डसाठी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी केल्या आहेत.
म्युकरमायकोसिस तथा काळी बुरशी सायनसमधून डोळ्यांच्या नसांपर्यंत व तेथून मेंदूपर्यंत पसरते. ती पूर्णत: खरवडून काढावी लागते. योग्यवेळी योग्य उपचार घेतले नाहीत, तर प्रसंगी जिवावरही बेतते. सध्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १२२ रुग्ण आहेत, त्यापैकी ५ रुग्णांना दृष्टी गमवावी लागली आहे. सायनसमधून पसरत गेलेल्या बुरशीने डोळ्यांच्या नसांवर हल्ला केल्याने त्या काढून टाकाव्या लागल्या. ५पैकी ४ रुग्णांच्या एका डोळ्याची नस काढावी लागली. त्यामुळे त्यांना अंशत: अंधत्व आले. एका रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांमागील नसांवर बुरशीने हल्ला केला. त्यामुळे दोन्ही नसा काढून टाकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याला पूर्ण अंधत्व आले. या रुग्णांची दृष्टी गेली असली तरी बुबुळे शाबूत आहेत, त्यामुळे चेहरा सुदृढ दिसतो. पण त्यांच्या आयुष्यात मात्र अंधार पसरला आहे.
चौकट : तीन जणांचा एक डोळा निकामी
काळ्या बुरशीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने तीन रुग्णांचे बुबुळ बचावले आहेत. नसा खराब झाल्या तरी बुबुळ बचावले व चेहरा सुखरूप राहिला आहे. मात्र, नसा काढून टाकल्याने दृष्टी गेली आहे. परंतु एक डोळा बसवला आहे.
चौकट: म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे
हा आजार कोरोनातून बरा झालेल्या रुग्णांना होत आहे. दातावर काळी बुरशी अथवा पिवळी बुरशी येते. त्याचबरोबर डोकेदुखी, ताप येऊ शकतो तसेच गालांच्या हाडावर सूजही येऊ शकते. फुप्फुसांमध्ये पोटामध्ये, त्वचेवर आणि रक्ताभिसरणातून सर्व शरीरभर पसरणारेही प्रकार आहेत.
चौकट : ही घ्या काळजी
काळ्या बुरशीमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. मधुमेही रुग्णांनी नेहमीच त्यांची साखरेची पातळी तपासत राहिले पाहिजे. तसेच स्टेरॉइड्स अजिबात घेऊ नका आणि अधिक आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
चौकट: औषधांचा पुरेसा साठा
म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. या रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधोपचाराची मोठी गरज असते. मात्र, सध्यातरी औषधांचा तुटवडा जाणवत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अगोदरच स्टेरॉईड घेऊन हे कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे आणखीन या रुग्णांना स्टेरॉईड देता येत नाही. असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
या सर्व रुग्णांना म्युकरमायकोसिसमुळे दृष्टी गमवावी लागली, असे म्हणता येत नाही. काही रुग्णांना पूर्वीपासून डोळ्यांचे विकार होते, ते म्युकरमायकोसिसमुळे बळावले. काही रुग्णांना मधुमेह होता, म्युकरमायकोसिस झाल्यावर मधुमेहामुळे गंभीर स्थिती झाली. अनेक रुग्णांना कोरोना झाल्यावरच आपल्याला मधुमेहासह अन्य विकार असल्याचे समजले.
-डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा