Mucormycosis: साताऱ्यात म्युकर मायकोसिसचा पहिला बळी; जिल्हा रुग्णालयात २२ रुग्णावर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 10:56 PM2021-05-20T22:56:49+5:302021-05-20T22:57:22+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच कोविड पश्चात म्युकरमायकोसिस या आजाराचा पहिला बळी गेल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सातारा: जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच कोविड पश्चात म्युकरमायकोसिस या आजाराचा पहिला बळी गेल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात बुधवारी म्युकर मायकोसीसचे आणखी पाच रुग्ण आढळून आले होते. यातील एका तरूण रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, गुरुवारी दुपारी या रुग्णाचा उपचार सुरू असताना अचानक मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हा रुग्णालय खडबडून जागे झाले. म्युकरमायकोसीसचा हा सातारा जिल्ह्यातील पहिला बळी असल्याचे समोर आले आहे.
कोरोनातून मुक्त झाल्यानंतर अनेक रुग्णांना हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. बुरशीमुळे हा आजार होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
डोळ्याला सूज येणे, डोळे लाल होणे, नाकाला सूज येणे अशी लक्षणे या आजाराची असून आतापर्यंत २२ रुग्ण जिल्ह्यात आढळले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. हे सर्व रुग्ण संशयित असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार आहेत.