Mucormycosis: म्युकरमायकोसिस झालं आता पोटदुखीच्या अॅटॅकचं दुखणं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 08:14 PM2021-06-26T20:14:53+5:302021-06-26T20:18:22+5:30
Mucormycosis: कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो हे सर्वज्ञात आहे. कोविडच्या दुसऱ्या स्टेनमध्ये विविध अवयवांवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतड्याचा रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिन्या बंद झाल्याने जिल्ह्यात अनेक रूग्णांना पोटदुखीचा अॅटॅक येत आहे. प्रचंड वेदनादायी असलेला ही पोस्ट कोविड पोटदुखी अनेकांच्या त्रासाचे कारण बनु लागली आहे.
प्रगती जाधव-पाटील
सातारा : कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो हे सर्वज्ञात आहे. कोविडच्या दुसऱ्या स्टेनमध्ये विविध अवयवांवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतड्याचा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद झाल्याने जिल्ह्यात अनेक रूग्णांना पोटदुखीचा अॅटॅक येत आहे. प्रचंड वेदनादायी असलेला ही पोस्ट कोविड पोटदुखी अनेकांच्या त्रासाचे कारण बनु लागली आहे.
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरीही पोस्ट कोविड दुखणं बळावू लागलं आहे. पुरेशी काळजी आणि योग्य उपचार या दोन्हीमुळे हा त्रास कमी होऊ शकतो असं वैद्यकीयतज्ज्ञ सांगतात. शास्त्रीय भाषेत या दुखण्याला मायक्रो एम्बोलिझम म्हटले जाते. कोविडमधून बरे झालेल्या रूग्णांना म्युकरमायकोसिसनंतर आता या पोटदुखीने ग्रासले असून अनेक रूग्ण यावर उपचार घेत आहेत.
किरकोळ स्वरूपातील पोटदुखीकडे दुर्लक्ष केलं तर पुढे शौचातून रक्त पडायला सुरूवात होते. हा या आजाराचा दुसरा टप्पा मानला जातो. आतड्याला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या बंद झाल्याने शौचाच्या आतड्यात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हे रक्त शौचात आढळल्यानंतर घाबरून न जाता तातडीने तज्ज्ञांकडून उपचार घेणे महत्वाचे आहे. ४५ वर्षांच्या आतील वयोगटात हा आजार आढळून येत असल्याने पुरेशी काळजी घेणं आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
आतड्यात होतंय गँगरीन!
पोटदुखीकडे दुर्लक्ष केल्यानंतर शौचातून रक्त पडण्याचा त्रास होतो. अनेकदा हे मुळव्याधीमुळे होत असल्याने त्या पध्दतीने औषधोपचार केले जातात. आतड्यांना रक्तपुरवठा होत नसल्याने आतडे काळेपडून त्यावर छिद्र पडल्याचेही काही रूग्णांमध्ये आढळून आले आहे. हे गँगरीनसारखे असल्याचे आढळून येते.
ही काळजी घ्या
पावसाच्या दिवसांत पचनसंस्था संथ झालेली असते. कोविडमधून बरे झालेल्यांनी पचायला हलका आणि सात्विक आहार घ्यायला प्राधान्य द्यावे. या दिवसांत बाहेरी अन्नपदार्थ आणि पाणी पिणं टाळावं. पाण्याची पातळी राखण्यासाठी नियमीत किमान चार लिटर पाणी पिल्याने शरिरातील विषाणूंचा शरिरातील लोड कमी होतो.
यासाठी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या
- तिव्र पोटदुखी
- जुलाब
- उलटी
- शौचातून रक्त पडणं
- ताप येणं
- पोट फुगणं
- बेशुध्द होणं
पावसाळ्याची सुरूवात झाल्यानंतर खाण्यात वेगळं आलं म्हणून पोटदुखीकडे कानाडोळा करण्यात येतो. याचा परिणाम आतड्यांवरही होऊ लागला आहे. किरकोळ स्वरूपात दुखणं असलं तरीही तज्ज्ञांकडे जाऊन त्याची चिकित्सा करणं गरजेचं बनलं आहे. पहिल्या टप्प्यात यावर उपचार विनासायास करणं सहज शक्य आहे.
- डॉ. संदीप श्रोत्री,
पोटविकारतज्ज्ञ, सातारा