धोम-बलकवाडीचे गढूळ पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:41+5:302021-09-16T04:48:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आदर्की : दुष्काळी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आदर्की : दुष्काळी फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडी धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे. हे पाणी शेतीला तारक ठरणारे असले तरी दुसरीकडे ग्रामपंचायतींकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणा नसल्याने ते आरोग्याला मारक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण तालुक्यातील गावे दुष्काळी होती. केंद्र व राज्य सरकारने पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी धोम-बलकवडीचे पाणी फलटण तालुक्यात आणले. ३१ डिसेंबर २०११ रोजी आदर्कीच्या माळावर धोम-बलकवडीच्या पाण्याचे पूजन विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे माजी सभापती दिवंगत शंकरराव जगताप, रोजगार हमी योजनेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत चिमणराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले. धोम-बलकवडी कालव्यामुळे तालुका टँकरमुक्त झाला. कालव्यातील पाण्यामुळे शेतीही पिकू लागली. हेच पाणी कालव्यातून ओढ्याला सोडले जायचे. पुढे याचा पाण्याचा सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीतून पिण्यासाठी पुरवठा केला जायचा. गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत होते; परंतु अलीकडे कालव्याच्या पाण्याबरोबर लाल माती वाहून आल्याने पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ झाले आहे.
कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडण्यात आले आहे; पण फलटण तालुक्यात वितरिका व पोट कालव्याची कामे अपूर्ण आहेत. हे गढूळ पाणी खासगी व सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीत सोडले जाणार आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींकडे पाणी शुध्द करण्याची यंत्रणा नसल्याने हे पाणी शेतीला तारक तर आरोग्याला मारक ठरणार आहे. याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.
फोटो : १५ आदर्की
फलटण तालुक्यात धोम-बलकवडी कालव्यातून गढूळ पाणी वाहत आहे. (छाया : सूर्यकांत निंबाळकर)