मुदगल यांनी राज्याचे मुख्य सचिव व्हावे
By admin | Published: April 24, 2017 10:04 PM2017-04-24T22:04:07+5:302017-04-24T22:04:07+5:30
कामकाजाचे कौतुक : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून जिल्हाधिकाऱ्यांना निरोप
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची सोमवारी बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीस आमदार शिंदे यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला आमदार शंभूराज देसाई यांनी अनुमोदन दिले. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांबद्दल गौरवोद्गार काढत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य सचिव व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनीही सर्वांचे आभार मानत ॠणानुबंध कायम राहतील, अशी ग्वाही दिली. त्यानंतर समितीच्या कामकाजास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी मुदगल यांनी प्रास्ताविक केल्यानंतर आमदार शिंदे यांनी पाणी योजनांचा मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रीय पेयजल योजनेचे अनुदान बंद झाले आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून जिल्ह्यात एकही योजना झाली नाही. जिल्हा नियोजन समितीतूनही निधीची तरतूद केली नाही त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून एकही नवीन पेयजल योजना झालेली नाही. आजपर्यंत किती प्रस्ताव प्रलंबित आहेत. किती पाठवले, किती मंजूर झाले आणि मागणी कधी होती याची सविस्तर यादी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी केली. आमदार शंभूराज देसाई यांनीसुद्धा जिल्हा नियोजन समितीतून निधी राखीव ठेवून ५० टक्के निधी नवीन योजनांना तर ५० टक्के निधी अपूर्ण योजनांना देण्यात यावा, अशी मागणी केली. गेल्या अडीच वर्षांत एकही नवीन योजना शासन करू शकलेले नाही. आमदार मकरंद पाटील यांनी राष्ट्रीय पेयजलच्या काही योजना अर्धवट आहेत. असलेल्या योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नाही. आमदार शिंदे यांनी याबाबत जिल्हा नियोजनमध्ये ठराव करू, अशी भूमिका मांडली.
आ. जयकुमार गोरे यांनी ‘जलयुक्त’ कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच १५८ रुपयांची कामे झाली आहेत त्याची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी मुदगल यांनी जलयुक्तच्या गुणवत्तेबाबतचे प्रश्न खोडून काढत गुणवत्ता तपासल्यानंतर बिले काढण्यात आल्याचे सांगितले. आमदार आनंदराव पाटील यांनी हनुमान संस्थेच्या उपोषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अनुपस्थित असल्याचे पालकमंत्री शिवतारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. यापुढे असे पुन्हा चालणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस द्यावी. बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुद्दे मांडले त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. (प्रतिनिधी)
शंभूराज देसार्इंच्यावर पालकमंत्र्यांची स्तुतिसुमने
आपल्याला बढती मिळून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत, हे खरे आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर ‘शिवसेनेत पक्षप्रमुखांचा आदेश महत्त्वाचा असतो. मला अचानकपणे मंत्रिपद दिले गेले आहे. शंभूराज देसाई यांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. साताऱ्यातील सर्वच आमदार अभ्यासू आहेत. शंभूराज मात्र विविध योजनांची माहिती घेऊन त्या योजनांचा निधी आपल्या मतदार संघात आणण्यासाठी कायमच तत्पर असतात, त्यांना मंत्रिपद मिळाले तर ते आणखी जोमाने काम करतील,’ अशी स्तुतिसुमने पालकमंत्री विजय शिवतारे यांनी आ. देसाई यांच्यावर उधळली.
श्वेता सिंघल
यांचे स्वागत
नवनियुक्त जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सोमवारी सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी त्यांचे स्वागत केले.
आयत्या विषयांनाही मंजुरीसातारा येथील गोडोली प्रवेशद्वार ते अजिंक्यतारा किल्ला रस्त्याचे नूतनीकरण व स्ट्रीट लाईट बसविणे
क्षेत्र महाबळेश्वर यात्रास्थळास ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
पाटण तालुक्यातील रस्त्यांची दर्जा उन्नती
संगममाहुलीत महाराणी ताराबाई समाधीचा जीर्णाेद्धार
वॉटर कप स्पर्धेतील तलावांची नावीन्यपूर्ण योजनेतून दुरुस्ती