मोघल सरदार रणदुल्ला खानाचे ‘रणदुल्लाबाद’
By Admin | Published: March 22, 2015 12:14 AM2015-03-22T00:14:01+5:302015-03-22T00:14:01+5:30
सोळाव्या शतकातील साक्षीदार: ऐतिहासिक परंपरेसह धार्मिक सलोखा जपणारे गाव
कमलाकर खराडे, पिंपोडे बुद्रुक : हरेश्वराच्या डोंगरापासून चवणेश्वर डोंगर रांगेतील मध्यावर डोंगर पायथ्याला रणदुल्लाबाद हे गाव वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, अफजल खानाच्या स्वराज्यावरील मोहिमेचे साक्षीदार असलेले हे गाव आहे. अफजल खानासोबत रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही होता. तो शिवरायांचा समर्थक म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे अफजल खानाने त्याला संपवून याठिकाणी त्याची कबर बांधली. तेव्हापासून या गावाला रणदुल्लाबाद नाव मिळाले.
सोळाव्या शतकात अफजल खानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणावेळी हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजल खानाच्या सैन्याचा या ठिकाणी सामना केला. त्यावेळी माहूर, ता. पुरंदर येथील जगताप बंधू अन् वाईचे पिसाळ-देशमुख या मराठा शिलेदारांवर शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली होती. लढाईनंतर जगताप अन् पिसाळ-देशमुखांनी या ठिकाणी वास्तव्य केले. यातूनच ‘रणदुल्लाबाद’ गाव वसले. या गावात जगतापांची घरे अधिक आहेत. छत्रपतींचा समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशाहीने अफझल खानावर मोठी जबाबदारी दिली होती. अफजल खानाबरोबर रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही या मोहिमेत सहभागी होता. मात्र, तो शिवाजी महाराज समर्थक म्हणून ओळखला जात होता. आदिलशाहाच्या दरबारात छत्रपती शहाजीराजे यांच्याबरोबर रणदुल्ला खान होता. या दोघांमधील मैत्री आदिलशाहीसाठी डोकेदुखी होती. त्यामुळे रणदुल्ला खान या मोहिमेविषयी नाराज होते. हरेश्वर डोंगररांगेजवळ खानाची छावणी पडली होती. त्यावेळी ज्या छावणीत अन् जगताप-देशमुख या राजांच्या सैन्यात युद्ध झाले होते. याच ठिकाणी अफजल खानाने त्यांच्यावर विष प्रयोग करून रणदुल्ला खानला संपवून त्याची कबर बांधली. त्यानंतर अफजल खानाने पुढे वाईच्या दिशेने प्रयाण केले. मात्र माहूरचे जगताप आणि वाईचे पिसाळ-देशमुख यांनी येथेच वास्तव्य केले. रणदुल्ला खान यांच्या कबरीमुळे या गावाला ‘रणदुल्लाबाद’ नाव पडले असल्याचे ज्येष्ठ सांगतात. रणदुल्लाबाद येथे एकच मुस्लीम कुटुंब राहते. मात्र गावाचा सामाजिक व धार्मिक सलोखा निश्चितपणे वाखाण्ययाजोगा आहे.
गावात एकही कूपनलिका नाही
गावात हिंदू-मुस्लीम ऐक्य असून, मोहरम आणि ईद साजरी केली जाते. गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. पंधरा वर्षांत पाणलोट विकास कार्यक्रम राबवून गावाने उत्तर कोरेगाव तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. वीस वर्षांपासून गावात कूपनलिकांवर बंदी आहे. त्यामुळे एकही वैयक्तिक कूपनलिका नाही. याबाबत अशी बंदी घालणारे रणदुल्लाबाद हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.
रणदुल्ला खानाची गावात कबर
रणदुल्लाबाद गावात मोघल सरदार रणदुल्ला खानाची कबर आहे. अफजल खानाने स्वराज्यावर स्वारी केली तेव्हा खानाबरोबर रणदुल्ला खानही होता. शिवाजी महाराज यांचा समर्थक असल्याचा संशय आल्यामुळे अफजल खानाने रणदुल्ला खानाला मारले आणि त्याची कबर बांधली.