सातारा जिल्हा परिषदेत राजकीय कार्यकर्त्याची मुजोरी; सुरक्षारक्षकाला मारहाण, कर्मचाऱ्यांतून संताप
By नितीन काळेल | Published: August 2, 2023 05:31 PM2023-08-02T17:31:17+5:302023-08-02T17:32:02+5:30
सातारा : सातारा जिल्हा परिषदेत राजकीय कार्यकर्त्यांच्या मुजोरीचे प्रकार वाढत असून बुधवारी तर एकाने सुरक्षारक्षकाला मारहाण केली. गाडी पार्कच्या ...
सातारा : सातारा जिल्हा परिषदेत राजकीय कार्यकर्त्यांच्या मुजोरीचे प्रकार वाढत असून बुधवारी तर एकाने सुरक्षारक्षकाला मारहाण केली. गाडी पार्कच्या कारणावरुन हा प्रकार झाला. याबाबतचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर या घटनेमुळे कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषदेत दररोज शेकडोच्या संख्येने लोक येतात. यातील अनेकजण वाहन घेऊन येतात. त्यासाठी जिल्हा परिषद आवारात वाहने उभे करण्याची ठिकाणी निश्चीत झालेली आहे. अधिकाऱ्यांची एका बाजुला वाहने असतात. तर कर्मचारी दुचाकीसारखी वाहने समोर उभी करतात. त्याच ठिकाणी कामासाठी येणारे नागरिकही दुचाकी उभ्या करतात. इथपर्यंत ठिक आहे. पण, काहीजण कार घेऊन येतात. तसेच ही वाहने मुख्य दरवाजासमोरच उभी करतात. याठिकाणी अधिकाऱ्यांचे वाहनही कधी त्यांच्या चालकाने उभे केले नाही. मात्र, जिल्हा परिषदेत कामासाठी येणारे राजकीय कार्यकर्ते दमबाजी करत मुख्य दरवाजासमोरच गाडी उभी करतात. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षक संबंधितांना मज्जाव करतात. त्यामुळे नाईलाजास्तव का असेना कार तेथून दुसरीकडे नेण्यात येते. पण, नेहमीच असा प्रकार होतो. त्यातूनच सुरक्षरक्षकांशी वादावादी होते. आज, बुधवारीही असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
आज, दुपारी एकच्या सुमारास एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आला होता. त्याच्याबरोबर कार्यकर्तेही होते. सर्वजण चारचाकी वाहनातून आलेले. मुख्य दरवाजासमोरच गाडी उभी केली. त्यातून सर्वजण खाली उतरले. त्यावेळी गाडी समोरच उभी केल्याचे पाहून तेथील सुरक्षारक्षकाने गाडी दुसरीकडे पार्क करण्याबाबत सांगतले. त्यामुळे संबंधित कार्यकर्ता चांगलाच चिडला. त्यातून बाचाबाची झाली. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि राजकीय पक्षाचे दोघे कार्यकर्ते इमारतीत आले. त्यावेळी कार्यकर्त्याने सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करत मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
त्यानंतर घडलेली घटना सुरक्षारक्षकांनी कर्मचाऱ्यांना सांगितली. पण, राजकीय कार्यकर्त्याच्या मुजोरीत वाढ झाल्याचेच यावरुन दिसून येत आहे. यामुळे अशा कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.