जिल्ह्यात बहुरंगी लढती
By Admin | Published: February 13, 2017 10:56 PM2017-02-13T22:56:24+5:302017-02-13T22:56:24+5:30
८१७ उमेदवार रिंगणात : जि. प., पं. स. निवडणुकीत शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी
सातारा : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोमवारी शेवटच्या क्षणी नाट्यमय घडामोडी घडत अनेक बंडोबा थंडोबा झाले, तर काही ठिकाणी बंडाळीचा वणवा कायम राहिला. सातारा जिल्ह्याच्या निवडणूक रणांगणात एकूण ८१७ उमेदवारांचं मैदान-ए-जंग पाहण्यास मिळणार आहे. बहुतांशी ठिकाणी बहुरंगी लढती होत आहेत.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा तालुक्यात १०४ जणांनी माघार घेतली. त्यांनी भाजपशी केलेली युतीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी समोर आली. काँगे्रस व भाजप या दोन टोकांच्या पक्षांना सोबत घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी तयार केलेले ‘राजकीय रसायन’ अनेकांना विस्मित करणारे ठरले आहे.
खंडाळा तालुक्यातील राजकीय आखाड्यात पक्षनेतृत्वाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावीत पक्षाविरोधात अनेकांनी दंड थोपाटले आहेत. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असून, काँग्रेसने तर लोटांगण घालीत अपक्ष आघाडीच्या तंबूचा आसरा घेतला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या चिंधड्या करीत बंडोबांनी अपक्षांचा झेंडा उभारला आहे. जिल्हा परिषदेच्या ३५ तर पंचायत समितीच्या ५६ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तालुक्यातील तीन गटांसाठी २० तर सहा गणांसाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
कोरेगाव तालुक्यातील पाच गटांतील २७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे २२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. दहा गणांसाठी ७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० जणांनी माघार घेतल्याने आता ३६ जण आपले नशीब आजमावत आहेत. नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे किन्हई पंचायत समिती गणातील उमेदवार तुकाराम वाघ यांनी अनपेक्षितरीत्या माघार घेतली, त्यानंतर काँग्रेसने लागोलाग अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या अॅड. अमोल राशीनकर यांचा पक्ष प्रवेश घडवित त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे.
फलटण तालुक्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गटातील ३९, तर गणातील ६७ अशा एकूण १०६ उमेदवारांनी तलवारी म्यान केल्या. गटाच्या ७ जागांसाठी ३३ तर गणाच्या १४ जागांसाठी ५४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात एकमेकांसमोर आव्हान उभे केले आहे. ही निवडणूक चौरंगी होत असून, निवडणुकीत काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष व भाजप, रासप असे नवे समीकरण जुळले आहे. महाबळेश्वर तालुक्यातून सर्वांत कमी अर्ज मागे घेतले गेले. दोन गटांतून पाच, तर चार गणांतून पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. तळदेव गटातील शिवसेनेच्या प्रमुख उमेदवार अर्चना सचिन शेटे यांनी सोमवारी अनपेक्षितपणे अर्ज मागे घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. निवडणुकीच्या मैदानात दोन गटांत पाच तर चार गणांतून दहा असे तालुक्यातून पंधरा उमेदवार उरले आहेत.
जावळी तालुक्यात ९६ उमेदवारांनी भरलेल्या ११८ अर्जांपैकी ८० अर्ज माघारी घेतल्याने तालुक्यातील तीन गटांसाठी १२ उमेदवार तर सहा गणांसाठी २६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तालुक्यात प्रथमच भाजपाने सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादीला आता शिवसेनेबरोबरच भाजपाशीही सामना करावा लागणार आहे.
वाई तालुक्यात गटासाठी १३ तर गणासाठी ३४ उमेदवार रिंगणात उरले असून, बंडोबांना थंड करण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश आल्याचे समोर आले आहे.
पाटण तालुक्यात गटातून २४ तर गणांतून ३८ जणांनी माघार घेतली. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व इतर पक्ष असा मुख्यत्वे चौरंगी लढतीचा महासंग्राम पाहावयास मिळणार आहे. फायनल देसाई-पाटणकर गटातच होणार असे दिसते. काळगाव गणातील अपक्ष उमेदवार पांडुरंग कुंभार हे उमेदवारी अर्ज बाद झाल्याच्या कारणावरून न्यायालयात गेल्यामुळे त्या गणातील अर्ज माघारीची प्रक्रिया १५ फेबु्रवारी रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.
माण तालुक्यात गटाच्या २३ तर गणातील ३२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता गटाच्या पाच जागांसाठी २४ तर गणाच्या १० जागांसाठी ४९ उमेदवार असे एकूण ७३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
खटाव तालुक्यातील सहा गट व बारा गणांसाठी एकूण ९५ अर्ज दाखल झाले होते. त्यातून जिल्हा परिषदेच्या २१ तर पंचायत समितीच्या ४२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. गटासाठी २७ तर गणासाठी ५३ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.