मुंबईकर करतायत गावचं राजकारण!
By admin | Published: July 28, 2015 11:25 PM2015-07-28T23:25:09+5:302015-07-28T23:25:09+5:30
गावोगावी निवडणुकांची रणधुमाळी : सुटी घेऊन गावातच मुक्काम; हालचालींवर बारीक लक्ष
सातारा : जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. गावागावांत निवडणूक हाच विषय चर्चेला जात आहे. मात्र, या सर्वांवर नजर आहे ती मुंबईकरांची. कामानिमित्त स्थायिक झालेले मुंबईकर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सुटी घेऊन गावी आले आहेत. हंगामी राजकारण करून मुंबईकर आख्खं गाव ढवळून काढत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.
जिल्ह्यात ७११ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. अर्ज माघारी घेण्याची तारीख उलटून गेल्यामुळे आता एकमेकांविरोधातल्या लढती स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शक्यतो छुपा प्रचार सुरू असतो. ग्रामीण भागामध्ये एकमेकांचे नातेवाईक, मित्र आणि भावकी यामध्ये मतांची गणिते ठरलेली असतात. स्थानिक पातळीवर एकमेकांचे मतभेद असल्यामुळे निवडणुकीमध्ये अशी लोकं एकमेकांना पाण्यात पाहतात. निवडणुकीत जिंकण्यापेक्षा ‘हार’मनाला चटका लावून जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वस्व पणाला लावून प्रचार सुरू असतो. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते, ती मुंबईकरांची.
नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या मुंबईकरांची गावच्या राजकारणाकडे विशेष नजर आहे. अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले. त्यानंतरच मुंबईकर सुटी घेऊन गावी खास प्रचारासाठी आले आहेत. जुन्या जाणत्या लोकांना भेटून आपलं गाव कसे मागे आहे, कोणामुळे आहे, आपण सुधारलं पाहिजे, अशी शाब्दिक फेकाफेकी करून आपल्या पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. मुंबईकरांच्या शब्दाला मान देऊन ‘हो.. रे तू सांगतोय त्यालाच आपण मतदान करणार,’असेही त्याला तात्पुरते आश्वासन दिले जात आहे. आळीतलं आणि भावकीतील मतदान किती आहे, याचे आडाखे मुंबईकर बांधत असले तरी गावची लोकं ताकास तूर कळून देत नाहीत. जेवणावळी घालून गावकऱ्यांना खूश केले तरी मतदान त्यालाच होईल, हेही सांगता येत नाही. तरीही मुंबईकरांचा आटापिटा सुरूच आहे.
हंगामी राजकारण करून गावचा विकास करायला आलेल्या मुंबईकरांना किती मनावर घ्यायचं, हे गावकरीच ठरवतोय. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईकरांची ‘हंगामी राजकारण’मध्ये होत असलेली एन्ट्री भावी ग्रामपंचायत सदस्य म्हणून होत असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)