देऊरच्या मुधाई देवीचा मुंबईच्या मैदानात थाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 10:50 PM2018-10-14T22:50:29+5:302018-10-14T22:50:39+5:30
वाठार स्टेशन : कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप असलेल्या देऊर येथील स्वयंभू मुधाई देवीच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती चारकोप मुंबई येथील मराठा ...
वाठार स्टेशन : कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप असलेल्या देऊर येथील स्वयंभू मुधाई देवीच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती चारकोप मुंबई येथील मराठा मित्र मंडळाने साकारली आहे. येथील दादोजी कोंडदेव मैदानावर या मंडळाने साकारलेला हा देखावा सध्या सर्वांचे आकर्षण ठरला आहे.
देऊर येथील ग्रामदैवत असलेल्या स्वयंभू मुधाई देवीच्या शारदीय नवरात्र उस्तवास सुरुवात झाली असून, नऊ दिवसांच्या या उत्सवात हजारोंच्या संख्येने राज्यभरातून भाविक भक्त देवीचे दर्शन घेतात, या देवीची अष्टमीला मोठी यात्रा भरते. मुधाईदेवी ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे प्रतिरूप असल्याने या देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. यादरम्यान रोज वेगवेगळ्या रुपात देवीची वेशभूषा केली जाते तसेच सकाळी व सायंकाळी मुधाई देवीची गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढली जाते.
अष्टमीच्या दिवशी पहाटेपासून यात्रेला प्रारंभ होतो. या दिवशी कडाकनी-धपाटेचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. दुपारी बारा वाजता शेजारील दहिगावमधील चव्हाण ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पालखी सोहळ्यास सुरुवात होते. दहिगाव येथील मुधोजी चव्हाण या भक्तामुळे या देवीचे नामकरण मुधाई देवी असल्याची कथा असल्याने या गावच्या ग्रामस्थांना पालखीचा मान दिला असल्याचे सांगितले जाते.
डोंगरकड्यात स्वयंभू स्थानापन्न असलेली मुधाईदेवी ही नवसाला पावणारी असल्याने या देवीला वर्षभर भाविक भक्ताची मांदियाळी असते. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि अवघ्या दीड फुटाचा मुख्य प्रवेशद्वार असल्याने या मंदिराला विशेष महत्त्व आहे. या देवीचं महात्म्य एकूण चारकोप येथील मुधाई भक्तांनी देऊरच्या या देवीच्या मंदिराची प्रतिकृती साकारून देवीचे महत्त्व जोपासले आहे. येथील मराठा मित्र मंडळाकडून सलग २३ वर्षे दुर्गाष्टमी साजरी केली जाते. चालू वर्षी या मंडळाने मुधाईचा देखावा साकारला आहे.