रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:17+5:302021-07-10T04:27:17+5:30
सातारा : शहरातील रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांवर सातारा पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल ...
सातारा : शहरातील रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांवर सातारा पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी ठिकठिकाणच्या विक्रेत्यांवर कारवाई केली तसेच काहींचे साहित्यही जप्त केले.
सातारा शहरातील अतिक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना आता शहरातील रस्तेही भाजी विक्रेत्यांकडून काबीज केले जात आहेत. बाजार समिती, मार्केट यार्ड, राधिका रस्ता, खंडोबाचा माळ मार्ग, मंगळवार तळे याठिकाणी दररोज रस्त्यावर भाजी मंडई भरवली जाते. या सर्व मार्गांवर वाहनांची सातत्याने वर्दळ असते. दुर्दैवाने एखादा अपघात झाल्यास त्यात एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. हा धोका पत्करून शेकडो विक्रेत्यांना रस्त्याकडेला भाजी विक्री करणे सोयीचे वाटते.
या धोक्याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘धोका पत्करू पण रस्त्यावर बसूनच भाजीपाला विकू’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी सकाळी ठिकठिकाणच्या विक्रेत्यांना पथकाकडून हटविण्यात आले तसेच काही विक्रेत्यांचे साहित्यही जप्त करण्यात आले. विक्रेत्यांनी रस्त्यावर बसून भाजी विकू नये अन्यथा संबंधितांवर यापुढेही दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
फोटो : ०९ सातारा पालिका
सातारा पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने शुक्रवारी रस्त्यावर बसलेल्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून काही विक्रेत्यांचे साहित्यही जप्त केले.
लोगो : लोकमत फॉलोअप