पालिकेच्या कृपेने पादचारी रस्त्यावर !
By admin | Published: April 16, 2017 10:48 PM2017-04-16T22:48:16+5:302017-04-16T22:48:16+5:30
पादचारी मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात : गाडे रस्त्यावर तर टेबल अन् खुर्च्या पादचारी मार्गावर; पालिकेकडून दुर्लक्ष
कऱ्हाड : शहरातील सौंदर्यात भर पडावी म्हणून पालिकेने शहरातील रस्त्यांसह त्याच्या बाजूने आकर्षक पादचारी मार्गाची उभारणी केली. त्यामुळे शहरातील नागरिक तसेच प्रवाशांकडून रस्त्यावरून चालण्या ऐवजी पादचारी मार्गाचा चांगला वापर केला जाऊ लागला. मात्र, आता बांधण्यात आलेल्या या पादचारी मार्गाचा प्रवासी कमी आणि विक्रेतेच जास्त फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे.
पालिका अन् पोलिस प्रशासनाच्या नियमांना डावलून हे विक्रेते बिनधास्तपणे आपला व्यवसाय फूटपाथवर करत आहे. त्यामुळे आता पालिकेच्याच कृपेने पादचारी रस्त्यावर आले आहेत.
शहरातील नागरिकांच्या व प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या पादचारी मार्गावर आता पुन्हा विके्रत्यांनी अतिक्रमण केले आहे. याचा सध्या प्रवासी अन् नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील दत्त चौक ते कृष्णा नाका सुमारे एक किलोमीटरच्या मार्गावरील रस्त्याकडेला सुमारे १९९५ च्या कालावधीत बांधण्यात आलेल्या पादचारी मार्गावर प्रवाशांची सारखी वर्दळ असते. त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विक्रेते व दुकानमालकांकडून आकर्षक पद्धतीने तयार केलेले जाहिरात फलक फूटपाथवरच ठेवत आहेत. तर दुसरीकडे बसस्थानकाबाहेरील पादचारी मार्ग तर रिक्षा व्यावसायिक व चायनीज व वडापाव विक्रेत्यांनी आपल्या मालकीचा केला असल्यासारखे दिसून येत आहे. पालिकेचे नियमित कर भरत असल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही या व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई होत असल्याचे दिसून येत नाही.
शहरातील सौंदर्यात भर घालणाऱ्या दत्त चौकापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील चौक, बसस्थानक परिसरापासून ते विजय दिवस चौक, टाऊन हॉलपासून ते उपजिल्हा रुग्णालय चौक तसेच उपजिल्हा रुग्णालयापासून ते कृष्णा नाका चौक या मुख्य रस्त्याच्या दोन्ही
बाजूंकडील कर्मवीर चौक या ठिकाणी दोन्ही बाजूस आकर्षक पादचारी मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यापैकी बसस्थानक परिसरात सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे.
रस्ता रुंदीकरणाबरोबरच पादचारी मार्ग बांधून त्यावर आकर्षक पेव्हिंग ब्लॉकही बसविले जाणार आहे. सध्या बसस्थानक परिसरात तयार करण्यात आलेल्या पादचारी मार्गावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असल्याने ही पादचारी मार्ग नक्की प्रवासी, पादचाऱ्यांसाठी की रिक्षा वडाप, फळविके्रते, व्यावसायिकांसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पादचारी मार्गाचा नागरिकांऐवजी दुकानदार, वडापाव, चायनीज, चहा विक्रेते, फळविके्रते यांच्याकडूनच जास्तच वापर केला जाऊ लागल्याने या विक्रेत्यांवर पालिका व पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांसह पादचाऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)