पालिका रस्ता दोन महिन्यांत वाहतुकीस खुला : ग्रेड सेपरेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 02:37 PM2019-12-07T14:37:16+5:302019-12-07T14:38:52+5:30
सातारा शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, नगरपालिका मार्गाचे काम जवळपास ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे उर्वरित काम करून दोन महिन्यांत वरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याची अंतर्गत कामेही प्रगतिपथावर असून, गोडोली आणि जिल्हा परिषद रस्ता पूर्णपणे सुरू होण्यास वेळ लागणार आहे.
सातारा : शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाऱ्या ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, नगरपालिका मार्गाचे काम जवळपास ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे उर्वरित काम करून दोन महिन्यांत वरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याची अंतर्गत कामेही प्रगतिपथावर असून, गोडोली आणि जिल्हा परिषद रस्ता पूर्णपणे सुरू होण्यास वेळ लागणार आहे.
सातारा शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, यासाठी पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे काम सुरू करण्यात आले आहे. सुमारे ६० कोटी रुपयांचे हे काम होते. मात्र, त्यानंतर गोडोलीकडे जाणाऱ्या मार्गाचे अधिक काम करण्यात येत आहे. त्यासाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण ग्रेड सेपरेटरचे काम हे ७५ कोटींवर गेले आहे. आता सेपरेटरचे काम सुरू होऊन पावणेदोन वर्षे झालीत. येत्या सहा महिन्यांत संपूर्ण काम करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
या सेपरेटरमधील पालिका मार्गाचे काम प्रथम हाती घेण्यात आले. या मार्गावर ५७५ मीटर लांबीचे काम करण्यात येत आहे. त्यामधील ३६० मीटरवर स्लॅब असणार आहे. सध्या स्लॅबचे संपूर्ण काम झालंय. तात्पुरत्या स्वरुपात वरून वाहने जात आहेत. तरीही वाहतुकीस अडचण येत आहे.
सध्या या मार्गावर वरील बाजूला माती आणि खडीकरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. त्यामुळे या मार्गावर दोन महिन्यांत वरूनतरी वाहतूक पूर्णपणे सुरू होईल, असा बांधकाम विभागाचा अंदाज आहे. तर रस्त्याची अंतर्गत कामे सुरूच आहेत. भिंतीला रंगीत फरशी लावण्यात येत आहे. डांबरीकरणाचे काम संपल्यानंतर मार्च अखेरीसपर्यंत अंतर्गत वाहतूकही सुरू होऊ शकते.
सेपरेटरमधील जिल्हा परिषद रस्त्याचे दुसऱ्या टप्प्यात काम हाती घेण्यात आले. या मार्गावर २२० मीटर लांबीचे काम करण्यात येत आहे. या मार्गावर १६० मीटरचा स्लॅब असून, तो पूर्ण झालाय. संरक्षक कठड्याचे काम झाले असून, सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत. जानेवारी अखेरपर्यंत या मार्गावरील वरून वाहतूक सुरू होऊ शकते, असे सांगण्यात आले. अंतर्गत वाहतुकीस वेळ लागणार आहे.
पहिल्या टप्प्यातील ३९ कोटी रुपये खर्च...
ग्रेड सेपरेटरमधील गोडोली रस्ता महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण, हा मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी आहे. ४२५ मीटर लांब असून स्लॅब १६० मीटरवर असेल. सध्या स्लॅबचे काम पूर्ण झालेलं आहे. नवीन वाढीव कामही प्रगतिपथावर आहे. हे काम जुलैपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर ग्रेड सेपरेटरच्या पहिल्या टप्प्यात ४८.५५ कोटींपैकी ३९ कोटी रुपये खर्च झालेले आहेत.