साताऱ्यात ५९ झाडांच्या प्रत्यारोपणासाठी पालिकेचे प्रयत्न
By प्रगती पाटील | Published: April 3, 2024 07:29 PM2024-04-03T19:29:59+5:302024-04-03T19:30:19+5:30
सातारा : रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ५९ झाडांपैकी सुयोग्य झाडांचे प्रत्यारोपण करण्याची धडपड सातारा पालिकेने सुरू केली आहे. पहिल्या ...
सातारा : रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या ५९ झाडांपैकी सुयोग्य झाडांचे प्रत्यारोपण करण्याची धडपड सातारा पालिकेने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात यातील पाच झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. ‘हरित सातारा’च्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने उर्वरित झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहेत.
सुभाषचंद्र बोस चौक ते जुना आरटीओ ऑफिस चौक या रस्त्यावर पावसाळी पाणी साचत असल्याने हा डांबरी रस्ता वारंवार खराब होतो. शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी हा रस्ता आहे. त्यामुळे पालिकेने या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. काँक्रिटीकरण व दोन्ही बाजूला ड्रेनेज या कामासाठी शासनाकडून सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काँक्रिटीकरण होणारा सातारा शहरातील हा पहिलाच वाहतुकीचा रस्ता आहे. सुमारे ५०० मीटर अंतराचा हा रस्ता आहे. या कामामुळे रस्त्याच्या दुतर्फा ५९ झाडे काढावी लागणार आहेत. झाड तोडण्या ऐवजी त्याचे पुनर्रोपण करण्याचा निर्णय सातारा पालिकेने घेतला. या कामी हरित सातारा ग्रुपने सहकार्याचा हात पुढे केला.
रस्त्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांपैकी पहिल्या टप्प्यात पाच झाडांचे यशस्वी पुनर्रोपण हुतात्मा स्मारक येथे करण्यात आले. टप्प्याटप्प्याने उर्वरित झाडांपैकी सुयोग्य झाडांचे पुनर्रोपण करून ती वाचवण्यात येणार असल्याचे पालिकेचे वृक्ष विभाग प्रमुख, अभियंता सुधीर चव्हाण यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. ही सर्व झाडे हुतात्मा स्मारक परिसर तसेच जुना आरटीओ ऑफिस चौक परिसरात पुनर्स्थापित करण्यात येणार आहेत.
पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या साताऱ्यातील हरित सातारा ग्रुपने या कामी सातारा नगरपालिकेबरोबर सहकार्याचा हात पुढे केला आहे. या ग्रुपचे मार्गदर्शक कन्हैयालाल राजपुरोहित म्हणाले, ‘वर्दळीच्या रस्त्यावरील प्रदूषणाची पातळी कमी करून ऑक्सिजन निर्मिती वाढवण्यासाठी झाडे मदतगार ठरतात. शिवाय विविध जीवांना आश्रय मिळण्याबरोबरच मातीची धूप आणि सुपीकता नियंत्रण हे फायदे होणार आहेत.’ शहरीकरणाच्या लाटेत वृक्षतोड होण्यापासून वाचवणे हा हरित सातारा चा मुख्य विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
५० किलो हळद मीठ अन् ३० किलो बटाटे!
हुतात्मा उद्यानात झाडांचे पुर्नरोपण करण्यात आले. ज्या खड्ड्यांमध्ये या झाडांचे रोपण करण्यात आले त्या खड्ड्यात ५० किलो मीठ, ५० किलो हळद, प्रत्येक झाडाला ३० किलो बटाटा या खड्ड्यात टाकण्यात आले होते.
रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी ही झाडे सुमारे दहा ते पंधरा वर्षांची आहेत. जमिनीपासून १२ फुटांवर झाडाची छाटणी करून झाडाच्या बुंध्याचे पुनरोपण सेंद्रिय पद्धतीने आम्ही करत आहोत. त्याची योग्य निगा राखल्यास नवी पालवी फुटून ही झाडे पुन्हा एकदा नव्या जागेत बहरतील. - श्रीधर थोरात, बिजांकुर फाऊंडेशन