अभिनेत्रीचा खून अनैतिक संबंधातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:02+5:302021-01-22T04:36:02+5:30
सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील (वय ५६, रा. गजानन हौसिंग सोसायटी, कृष्णानगर, सातारा) यांचा खून अनैतिक संबंधातून झाला ...
सातारा : ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील (वय ५६, रा. गजानन हौसिंग सोसायटी, कृष्णानगर, सातारा) यांचा खून अनैतिक संबंधातून झाला असून, हा खून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड (मावेली) येथील अनंत दाजीबा पेडणेकर (वय ३३) या युवकाने केला असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी पेडणेकर याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विविध मालिका आणि वेबसीरीजमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील यांची शनिवार, दि. १६ रोजी मध्यरात्री राहत्या बंगल्यामध्ये अज्ञाताने गळा चिरून हत्या केली होती. या घटनेमुळे सिनेक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. शहर पोलीस ठाण्यातील दोन पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक या खून प्रकरणाचा तपास करत होते. गत चार दिवसांपासून पोलिसांनी अभिनेत्री जया पाटील यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करणाऱ्या व्यक्तींचीही कसून चौकशी केली. त्यानुसार पोलिसांनी अनंत पेडणेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली आहे. अभिनेत्री जया पाटील या अनैतिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होत्या. त्यामुळेच त्यांचा खून केल्याचे पेडणेकरने पोलिसांना सांगितले. पेडणेकरची आणि अभिनेत्री जया पाटील यांची काही महिन्यांपूर्वीच साताऱ्यात ओळख झाली होती. या ओळखीतूनच जया पाटील या त्याला फोन करून घरी बोलावत होत्या. घटनेदिवशीही पेडणेकर घरी आला. नेहमीसारखीच जया पाटील यांनी जबरदस्ती केल्याने पेडणेकरने त्यांचा चाकूने गळा चिरल्याचे तपासात समोर आले.
चौकट :
पोलीस अधीक्षकांची शाबासकीची थाप ...
अभिनेत्री जया पाटील यांचे फोनवर अनेकांशी संभाषण होत होते. त्यामुळे खुनाचा छडा लावणे पोलिसांसमोर आव्हान होते. जया पाटील यांना ज्यांचे वारंवार फोन आले, त्यांच्याकडे पोलिसांनी कसून तपास केला. अत्यंत कौशल्याने केवळ चार दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सातारा शहरच्या गुन्हे प्रकटीकरणच्या टीमचे कौतुक केले.